आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभर केव्हाही करा गौरींचे आवाहन, गौरी-गणेशाच्या आरासासाठी साहित्य बाजारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गौरींचे गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर आवाहन करावयाचे असल्याने संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन भोजन असून शुक्रवारी परंपरेप्रमाणे गौरीपूजन करावे. शनिवारी सकाळी ६.५२ नंतर मूळ नक्षत्रावर दिवसभरात केव्हाही गौरीचे उत्तरपूजन करून गौरीविसर्जन करता येईल. परंपरेप्रमाणे गौरीचे दोरे घेता येतील.

सुवासिनींची जय्यत तयारी
घरस्वच्छता करण्यापासून ते गौरींच्या मुखवट्याचे रंगकाम, त्यांच्यासाठी केले जाणारे मांडव यांच्या जोडणीचे काम महिला करत आहेत. तर बाजारात शोभेच्या वस्तूंसाठीही मोठ्या प्रमाणावर महिलावर्गाची गर्दी आहे. त्यात मंगळसूत्र, साड्या हार आणि इतर दागिन्यांना अधिक मागणी अाहे. महिला रेडिमेड साड्यांना अधिक महत्त्व देत आहेत. तर त्यात खास रेशमी साड्यांना खूप पसंती आहे.

बाजारही फुलला
गौरींच्यासाड्या, दागिने आदी वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. भाज्या, फळे, नारळ आणि वस्त्रमाळ, पूजेचे इत्यंभूत साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. भाज्यांची आवक असल्याने बाजारात मुळा, पडवळ, काकडी, भेंडी पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.
आरासासाठी साहित्य बाजारात
लाडकाबाप्पा आणि गौरींच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून, विविध प्रकारचे सजावट साहित्य बाजारात विक्रीस आले आहे. यात मखर, प्लास्टिक फुलांचे तोरण, कारंजे, दिव्यांच्या माळा आदी साहित्याचा समावेश आहे.

मधला मारुती, आसरा चौक, गणेश शॉपिंग सेंटर, सुराणा मार्केट, टिळक चौक, विजापूर नाका आदी भागात या साहित्यांची दुकाने थाटली अाहेत. मूर्तीमागे लावण्यासाठी चक्राकार पंखे, थर्मोकोलचे विविधरंगी मखर आदींचे विविध प्रकार आले असून १०० रुपयांपासून यांच्या किमती आहेत.

थर्मोकोलचे आकर्षक खांब कळस यांनाही मागणी असल्याचे विक्रेते प्रमोद अपशिंगे यांनी सांगितले. शिवाय विविध देशी विदेशी प्रकारातील कृत्रिम प्लास्टिकची फुले आणि त्यांचे गुच्छही बाजारात विक्रीस आले आहेत. विविध प्रकाराच्या चिनी दिव्यांच्या माळा, फोकस दिवे, फिरते दिवे, झुंबा दिवा यांनाही मागणी आहे. यंदासुद्धा उंच उडणारे आणि कमळाच्या आकारात उमलणारे कारंजे विक्रीस आहेत. याच्या किमती २५० रुपयांपासून पुढे आहेत. तसेच गौरींचे मंडप, तोरणे, भरजरी शालू, मुखवटे, तयार साड्या आदींनाही मागणी असल्याचे शिवगंगा बचत गटाच्या जयश्री पाटील यांनी सांगितले.
किमती अशा (रुपयांत)
चिनी दिवे माळा - २० पासून
फिरती एलइडी - ५० पासून
ठिपकेदार प्रकाशझोत - १०० पासून
स्वदेशी माळ - १५० पासून
पाण्यात फिरणारा सील मासा - २००
म्हैसूर कारंजे - २५०
मोठी कारंजे - ४०० पासून
फोकस लाइटिंग - ५०० पासून
गौरींचे मंडप - ७०० पासून
बातम्या आणखी आहेत...