आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळाः शपथपत्र सादर करा, अन्यथा हजर राहा-जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३ एप्रिल २०१६ पर्यंत शपथपत्र दाखल करावे, अन्यथा त्यांनी १३ एप्रिल रोजी व्यक्तीश: हजर रहावे, असे आदेश आैरंगाबाद हायकोर्टाचे न्या. ए. व्ही. निरगुडे आणि न्या. व्ही. एल. आचलिया यांनी दिले.

तुळजापूर पालिकेंतर्गत घरकुल योजनेचे काम निकृष्ट अंदाजपत्रकानुसार होत नसल्याबाबत तसेच ठेकेदार यांची निवड नियमानुसार झाली नसल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश यापूर्वी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी दिले होते. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नाही. तर मुख्याधिकाऱ्यांंनी शपथपत्र दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनीच शपथपत्र दाखल करण्याचे २९ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशात स्पष्टपणे निर्देश दिले असताना जिल्हाधिकाऱ्यांंनी शपथपत्र दाखल केले नसल्यामुळे वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. तुळजापूर येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ माने यांनी अॅड. विजयकुमार सपकाळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. घरकुल योजनेचे काम निकृष्ट अंदाजपत्रकानुसार होत नसल्याबाबतची तक्रार याचिकाकर्त्याने २७ जुलै २०१२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात ठेकेदार एम.व्ही. पंधे यांची निवड चुकीची झाल्याचे नमूद केले आहे. ठेकेदाराला दिलेला दोन कोटी रुपये मोबीलायझेशन अॅडव्हान्स नियमानुसार दिलेला नसल्यामुळे ती रक्कम ठेकेदाराकडून वसूल करावी त्यांचे कंत्राट रद्द करावे, असे स्पष्ट नमूद केल्याचे नमूद करून इतरही आक्षेप माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २० फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या निवेदनात घेतले होते. या प्रकरणात अॅड. सपकाळ यांना अॅड. पंडित डिकले सहकार्य करीत आहेत. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ए. जी. मगरे आणि प्रतिवादीतर्फे अॅड. के. के. कुलकर्णी काम पाहात आहेत.