आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापूरसह 5 जिल्‍ह्यातील हेल्‍मेटसक्‍तीला तूर्तास स्‍थगिती; विश्वास नांगरे-पाटीलांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरसह सांगली, सातारा ,पुणे ग्रामीण आणि सोलापूर अशा शहाराअंतर्गत हेल्मेटसक्तीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र महामार्गावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेटसक्ती केली जाईल, अशी माहिती गुरुवारी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

कोल्हापुरात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसिना फरास, न्यूरोसर्जन डॉ.सुरेश प्रभू आदींसह सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

15 जुलैपासून कोल्हापूर शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला शहराचे आमदार राजेश क्षीरसागर आणि सर्वपक्षीय कृती समितीने तीव्र विरोध केला होता. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेत्यांनी विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर शहरात हेल्मेटसक्ती करू नये या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी बोलताना कृती समितीचे निमंत्रक आर.के.पवार म्हणाले की, अधिकारी बदलला की नव्या येणाऱ्या अधिकाऱ्याची कामाची पद्धत बदलते. कोल्हापूर शहराची व्याप्ती केवळ 5 ते 6 किलोमीटर परिघात आहे. छोट्या शहरात हेल्मेटसक्ती केल्याने बहुतांशी प्रश्न उभे राहणार आहेत. त्यामुळे 10 किलोमीटर क्षेत्र वगळून महामार्गावर हेल्मेटसक्ती करण्याला आमचा विरोध नाही. त्यानंतर जेष्ठ नेते सुभाष वोरा म्हणाले की, या आधी अपघात झाले नाहीत का ? या अपघातांचे परिणाम ज्यांना भोगावे लागले त्यांच्यासाठी पोलिसांनी काय केले? असा सवाल करून अशा बैठका घेवून काय निष्पन्न होणार ते आधी सांगा. हेल्मेट वापरावर आमचा कोणताही विरोध नाही मात्र वर्दीच्या धाकात काहीही न करता प्रबोधन करून हेल्मेट वापराबाबत लोकांना प्रवृत्त करावे, असे ते म्हणाले. बाबा इंदुलकर म्हणाले विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा खाकी वर्दीतला माणूस कोल्हापूरच्या लोकांची डोकी सुरक्षित रहावीत याचा विचार करत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र अपघात चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने होतात, शहरातील रस्ते सुस्थितीत नाहीत,केवळ पडला आणि अपघात झाला यासाठी हेल्मेट म्हणजे ही जबरदस्ती आहे. आमदार क्षीरसागर म्हणाले की, हेल्मेट वापरायला आमचा विरोध नाही. मात्र सक्ती करू नका, आधी जनजागृती करा, त्यासाठी आधी कोल्हापूर महानगर पालिकेच्या माध्यमातून वाहतुकीस शिस्त लागेल अशी व्यवस्था तयार करा. महापौर फरास म्हणाल्या की, नागरिकांनी आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जागरूक असले पाहिजे. यानंतर सतीश कांबळे, कॉ.चंद्रकांत यादव, माजी महापौर अॅड.महादेवराव आडगुळे, अॅड.प्रकाश मोरे, दिलीप देसाई, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हेल्मेटसक्ती करण्याच्या पोलिसांच्या आदेशानंतर कोल्हापूर शहरात अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महामार्गावर हेल्मेट सक्ती करा मात्र कोल्हापूर शहरात अशी सक्ती करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले होते. सर्वसामान्यांना वेठीस धरून, त्रास देऊन कोणतीही मोहीम राबविणार नाही, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनीही स्पष्ट केले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, हेल्मेट वापराबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नाही मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. दुचाकी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रत्येक वाहन विक्रीनंतर दोन हेल्मेट वाहनधारकाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तशी नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात लोकांमध्ये प्रबोधन करून टप्प्याटप्प्याने त्यांना हेल्मेट वापरासाठी प्रवृत्त करण्याचा विचार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून परिक्षेत्रातील पोलिस वाहतुकीच्या विषयावर काम करत आहेत. गतवर्षीच्या प्रमाणात यंदा अपघातांचे प्रमाण घटले आहे हे मोठे काम आहे. म्हणूनच लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. सुरवातीच्या टप्प्यात शाळा- महाविद्यालये, उद्योग-धंदे याठिकाणी जाऊन आम्ही प्रबोधन करणार आहोत. तेथील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराचे फायदे सांगण्यात येतील.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये शनिवारपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय झाल्यानंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक हडबडून गेले होते.शहरात वाहनांना वेग नसतो त्यामुळे छोट्या शहरात हेल्मेट सक्ती नको अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पुढील स्लाइडवर... संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...