आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात उपलब्ध होणार ९० हजार टीसीएम पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- जिल्ह्यातसुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची उपयुक्तता सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या प्रमाणात पाऊस सुरू राहिला तर झालेल्या कामानुसार ९० हजार ६७१ टीसीएम पाणी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत अभियानाच्या कामासाठी १०१ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून होणारी वृक्षतोड, भूजलाचा बेसुमार उपसा, उसासारख्या पिकांसाठी दिले जाणारे अनियंत्रित पाणी आदी कारणांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळात भूगर्भातील पाण्याचा चांगला आधार मिळाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आताच्या दुष्काळात खोलवर कूपनलिका घेऊनही पाणी उपलब्ध हाेत नाही, यामुळे दाहकता अधिक जाणवत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत याचा प्रत्यय प्रकर्षाने जाणवला.

किमान पावसाचे उपलब्ध होणारे पाणी वाहून जाता शिवारातच मुरावे यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. आतापर्यंत पाऊसच पडत नव्हता. यामुळे याचा परिणाम कसा आहे, हे समजत नव्हते. आता पावसाने बरसण्यास सुरुवात केल्यामुळे याचा परिणाम दिसत आहे.
अभियान राबवण्यात आलेल्या शिवारात साठलेले पाणीच याची साक्ष देत आहे. नद्या, ओढे, नाले पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असतात, असा समज हाेता. मात्र, अभियानामुळे याच्या माध्यमातून पाण्याचा संचय होऊ शकतो तसेच पाणी जिरवताही येते, याची प्रचिती आली आहे. सध्या झालेल्या कामांमुळे ९० हजार ६७१.५९ टीसीएम पाणी साठणार आहे. यातून एक लाख २० हजार ८९५ हेक्टर जमीन एका वर्षभरासाठी सिंचनाखाली येणार आहे. सध्याचा पाऊस यादृष्टीने कमीच आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.

३९६विहिरींचे पुनर्भरण
जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून ११ हजार २५८ विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत याला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. ठरवलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ३९६ विहिरींचे काम झाले आहे, तर १० हजार ८६२ विहिरींचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. यासाठी २३ लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे आता विहिरींचे अधिक पुनर्भरण करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील कामांची स्थिती
३०,३३३- निर्धारीत कामे
१३,१२७- कामे पूर्ण
१७,२०६- कामे प्रगतीपथावर
१०१.५२- कोटी खर्च
१,२०,८९५- हेक्टरला फायदा
८.४४- कोटी नाला सरळीकरण


खोलीकरणासाठी आठ कोटी रुपये
जवळपासप्रत्येक गावाच्या शिवारातून नाला वाहतो. या नाल्यांतून प्रत्येक पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. यामुळे या अभियानात अन्य नियमित कामांसह नाला खोलीकरण सरळीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी एक हजार १०४ ठिकाणी अशी कामे निर्धारीत करण्यात आली आहेत. यामध्ये ६४५ कामे पूर्णत्वास गेली आहेत, तर ४५९ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत याच्यावर आठ कोटी ४४ लाख सात हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामधून २५ हजार ८०० क्षेत्रावर सिंचन होणार आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष मोठ्या नद्यांमध्येही खोलीकरण करण्यात आले आहे. शेकडो वर्षांपासून या नद्यांनी केवळ पाणी वाहून नेण्याचे काम केले आहे. मात्र, आता याच नद्या अभियानामुळे पाणी तगवून ठेवण्याचे काम करत आहेत.

कंपार्टमेंट बंडिंग
जलयुक्तशिवार योजनेतून चार हजार ३३५ ठिकाणी कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यात येत आहेत. यापैकी दोन हजार ९४९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच एक हजार ३८६ कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत यासाठी ३८ कोटी ८५ लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे ५४ हजार ४९७.५२ हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. या कामांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी वाचणार आहे. तसेच माती वाहून जाण्याचे प्रकारही कमी होणार आहेत.

३० हजार कामे
जलयुक्तशिवार अभियानातून जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० हजार ३३३ कामे निर्धारीत करण्यात आली आहेत. यामध्ये १३ हजार १२७ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १७ हजार २०६ कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, खोल समतल चर निर्मिती, नाला खोलीकरण सरळीकरण, लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळ्यांची निर्मिती, साखळी सिमेंट नालाबांध, ठिबक तुषार सिंचन, पाझर तलावांची दुरुस्ती, विहीर पुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे.

१०१ कोटींचा खर्च
जलयुक्तशिवार अभियान कृषी, वन, जलसंधारण, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण विभाग, सामाजिक वनीकरण, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याच्या माध्यमातून विविध निधीतून एकूण १०१ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आले अाहेत. यातील सर्वाधिक खर्च कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. ९२ कोटी १३ लाख ७४ हजार रुपये खर्च झाले आहेत. अन्य विभागांमार्फत नऊ कोटी ३८ लाख ७३ हजार रुपये खर्च झाले आहेत.

लोकसहभागातून काढला गाळ
अभियानराबवण्यासाठी लोकसहभागालाही महत्त्व देण्यात आले आहे. कामे करण्यासाठी लोकवाटा घेण्यात आला आहे. यामध्ये तळ्यातील मोठ्या प्रकल्पातील गाळ पूर्णत: लोकसहभागातून काढण्यात आला आहे. यासाठी ६१२ ठिकाणी कामे करण्याचे निर्धारीत करण्यात आले होते. यापैकी ७६ ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी लोकसहभागातून आतापर्यंत २५ कोटी लाख ५६ हजार रुपये खर्च झाला आहे.