आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडलसंगममध्ये पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची वाढणार गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्रावणमासाच्यापहिल्या दिवशी शनिवारी (दि. १५ ) कुडलसंगम (ता. हुनगुंद, जि. बागलकोट) येथील श्री संगमेश्वर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या ऐक्यस्थलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लागून आलेल्या सुट्यांमुळे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी (दि. १७) तेथे दर्शनासाठी गर्दी वाढणार आहे.
श्रावणमासात शिवदर्शनला विशेष महत्त्व आहे. या महिनाभरात शिवमंदिरांमध्ये आणि शैव संप्रदायातील विविध देवस्थानांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. शनिवारी श्रावणमासातील पहिला दिवस होता. त्यामुळे कुडलसंगम येथील संगमेश्वर महात्मा बसवेश्वर यांच्या ऐक्यस्थलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शनिवारी स्वातंत्र्यदिन सोहळा असल्याने तुलनेने गर्दी कमी होती.
रविवारी (दि. १६) साप्ताहिक सुटी, त्यानंतर मंगळवारी (दि. १८) पारसी न्यू इयरमुळे शासकीय सुटी आहे. बुधवारी (दि. १९) नागपंचमी आहे. या सणाला शासकीय सुटी नसली तरी महाराष्ट्रातील सीमाभागातील शाळा मुख्याध्यापकांच्या अधिकारात सुट्या घेतात तर कर्नाटकात या सणासाठी दोन दिवस शासकीय सुट्या असतात. सोमवार वगळता सलग तीन-चार दिवस सुट्या आहेत. सोमवारी रजा टाकून सलग सुटी अनुभवता येऊ शकते. त्यामुळे कुडलसंगम येथे पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

कसेजाऊ शकाल?
सोलापूरहून१८८ किलोमीटरवर कुडलसंगम आहे. सोलापूरहून सकाळी साडेसहा वाजता हुबळी एक्स्प्रेसने आणि साडेसात वाजता बसव एक्स्प्रेसने आलमट्टीपर्यंत जाता येते. तेथून कर्नाटक परिवहनच्या बसने कुडलसंगमला जाता येईल. विजापूर येथून कुडलसंगमला जाण्यासाठी सोय आहे. कर्नाटक परिवहनच्या बसने तिथे जाता येते.
कुडलसंगम येथे काय आहे
कुडलसंगमयेथे कृष्णा मलप्रभा या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमनाथाचे चालुक्यकालीन मंदिर आहे. या ठिकाणी बाराव्या शतकात जातवेद मुनींच्या आश्रमात जगातील पहिले सामाजिक क्रांतिकारक श्री महात्मा बसवेश्वर यांचे शिक्षण झाले. तसेच येथेच श्री बसवेश्वर लिंगैक्य पावले. त्या ठिकाणी एेक्य मंटप उभारण्यात आला आहे. संगमात ऐक्य मंटपाभोवती केलेले बांधकाम पाहण्यासारखे आहे. तसेच कुडलसंगम विकास प्राधिकरणाने या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास केला आहे. येथे श्री बसवेश्वरांच्या जीवनचरित्र, शरण चळवळीवर प्रकाश टाकणारी आणि शरण-शरणींची शिल्पे साकारली आहेत. तसेच सहा हजार लोक बसू शकतील, असे सभागृह संग्रहालय आहे.
जवळची पर्यटनस्थळे
कुडलसंगमच्याअलीकडे २२ किलोमीटर अंतरावर आलमट्टी धरण आहे. तेथील रॉक गार्डन कृष्णा गार्डन ही उद्याने प्रेक्षणीय आहेत. तसेच तेथे सायंकाळी साडेसातपासून सुरू होणारा लेझर शो हा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. तसेच विजयपूर येथील गोलघुमटसह विविध ऐतिहासिक, शिवगिरी बदामी (६५ कि.मी.), पट्टदकल (५० कि.मी.), ऐहोळे (३७ कि.मी.) ही ऐतिहासिक धार्मिक स्थळेही पर्यटकांना खुणावतात.