आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुराच्या नावे काढलेले कर्ज ‘लोकमंगल’ने भरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- ऊसतोडणी मजुराच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा विषय प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यानंतर  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या “लोकमंगल’ उद्योग समूहातील साखर कारखान्याने ती रक्कम बँकेत मजुराच्या खात्यावर भरली. तसेच देना बँकेच्या सोलापुरातील चाटी गल्ली शाखेने दिलेला थकबाकी नसल्याचा दाखला मंगळवारी (दि. ८) सकाळी इंदापूर येथे मजुराच्या घरी पोहोच केला.  
 
इंदापूर येथील महादेव मस्के हे  सपत्नीक लोकमंगल साखर कारखान्याकडे ऊसतोडणी कामास होते. त्यांनी  मुकादमामार्फत  दोन हंगामांत हे काम केले.  सध्या ते  इंदापूर परिसरात  मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. २९ जुलै रोजी त्यांना देना बँकेची १९ लाख रुपये भरण्याची नोटीस मिळाली. त्यामध्ये लोकमंगल कारखान्यामार्फत २०१५-१६ वर्षासाठी ऊसतोडणी,  वाहतुकीसाठी घेतलेल्या १५ लाख रुपयांची त्यांनी परतफेड केली नाही,  १९ लाख रुपये भरावे, असे बजावले होते. आपण कसलेही  कर्ज काढले नसताना बँकेकडून आलेली नोटीस पाहून महादेव मस्के व त्यांचे कुटुंबीय चिंताक्रांत झाले. परस्पर कर्ज उचलण्याचा लोकमंगलचा आणखी एक प्रताप यानिमित्ताने उघड झाला. 

याची माहिती प्रसारमाध्यमांना समजल्याची कुणकुण कारखाना प्रशासनाला लागली. त्यामुळे मस्के यांच्याकडे नोटिसीची प्रत माघारी मागण्यासाठी लोक येऊ लागले. दरम्यान, कर्जदार शेतमजुराच्या नावे त्याच्या परस्पर कर्ज खात्यावर पैसे भरून संबंधित खात्याचा बेबाकी दाखला महादेव मस्के यांच्याकडे पोहोचवण्यात आला.  त्यांच्या नावे काढलेले कर्ज भरल्यामुळे मस्के कुटुंबीयांना दिलासा मिळाला. मात्र,  त्यांच्या परस्पर बँकेने एवढे कर्ज मंजूर केलेच कसे, त्यांच्या परस्पर ते उचलले कसे आणि परस्पर भरलेही कसे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...