आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध सावकारी तारणापोटी दिलेली शेतजमीन १७ वर्षांनी परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार केलेल्या कारवाईमुळे परिते (ता. माढा) येथील गोरख बाबू कुंभार या शेतकऱ्यास तीन एकर जमीन परत देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी दिली. सावकाराच्या ताब्यातील जमीन मूळ मालकास परत देण्याबाबत कायदा सन २०१४ मध्ये मंजूर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पहिलाच निवाडा आहे.
शुक्रवारी सकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते निकालाची प्रत गोरख कुंभार यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देण्यात आली. यावेळी प्रभारी विभागीय सहनिबंधक यशवंत गिरी, विशेष जिल्हा लेखा परीक्षक व्ही. व्ही. डोके आणि तालुका उप निबंधक कुंदन भोळे उपस्थित होते.

गोरख कुंभार यांनी १९९९ मध्ये ३० हजार रुपयांसाठी एक हेक्टर २१ आर जमीन बबन रणदिवे यांच्याकडे गहाण ठेवली होती. रणदिवे यांनी ती बाबू धनवडे (रा. नांदोरे, ता. पंढरपूर) यांना पोकळ स्वरूपी खरेदीवर दिली होती. त्या जमिनीवर सन २०११ मध्ये श्री. धनवडे यांचे नाव लावण्यात आले. यास आक्षेप घेऊन श्री. कुंभार यांनी उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल केला होता. यावर सर्व प्रक्रिया करून २० ऑक्टोबर १९९९ रोजी करून दिलेले खरेदीखत अवैध असल्याचे घोषित करून रद्द करण्यात आले. त्याचबरोबर श्री. रणदिवे आणि श्री. धनवडे यांच्यातील व्यवहार सावकारी अंतर्गत गहाणखत असल्याने तोही रद्द करण्यात आला आणि शेतजमीन श्री. कुंभार यांना परत करण्यात आली. त्याचरोबर सदर आदेशाची प्रत महसूल विभागाकडे पाठविण्यात आली असून त्यानुसार त्यांच्या दफ्तरी श्री. कुंभार यांच्या नावाची नोंद घ्यावी, अशी विनंती करण्यात आल्याचे श्री. आघाव यांनी सांगितले. या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी २६ सुनावण्या घेण्यात आल्या. पहिली सुनावणी एप्रिल २०१५ रोजी तर शेवटची सुनावणी नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आली.

खासगी सावकारावर गुन्हा दाखल नाही
खासगी सावकारी केल्याबद्दल बबन रणदिवे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात खासगी सावकारकीच्या ७८ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात गुन्हा नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...