आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणालने या दिवाळीत सर्वांची आवर्जून भेट घेतली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - जम्मू-काश्मीरमधील नागरोटा येथे पाकिस्तानने केलेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना वीरमरण प्राप्त झालेल्या मेजर गोसावी यांच्यावर गुरुवारी (१ डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर कुणालचा तिसरा दिवस करून वडील मुन्नागीर गोसावी हे आपल्या घरी आलेले होते. या वेळी सर्वच क्षेत्रातील अनेक नागरिक त्यांना या दु:खद प्रसंगात धीर देण्यासाठी आलेली होती. या वेळी आपल्या मुलाच्या लहानपणीच्या तसेच कॉलेज जीवनापासून ते आर्मीमध्ये मेजर होईपर्यंतच्या त्याच्या काही आठवणींना ते उजाळा देत होते.
लहानपणापासूनच त्याला देशसेवा करण्याची खूपच आवड होती. शाळेमध्ये असताना तो एनसीसीमध्ये सहभागी होत असे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयातून त्याने बी.कॉम.ची (वाणिज्य) पदवी संपादन केली. याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एनसीसीमधून २६ जानेवारीच्या दिल्ली येथील परेडसाठी त्याची निवड झालेली. मात्र परीक्षा असल्यामुळे दोन्ही वेळेला तो दिल्लीतील परेडमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

लोकांना मदत करणे हा त्याचा स्वभावधर्म होता. अगदी लहानपणापासून दिवाळीमध्ये गल्लीतील मुलांना फटाके देण्याचा त्याला छंद होता. तो आर्मीमध्ये असतानाही दिवाळीला घरी येऊ शकत नसला तरी घराकडे फटाके मात्र जरुर पाठवत असे. सणात घरची मंडळी तसेच गल्लीतील मुले त्यांनी पाठविलेल्या या फटाक्यांचा मनसोक्त आनंद घेत असत. सामाजिक कामाचीही त्याला पहिल्यापासूनच गोडी होती. त्यामुळेच पुण्यात कॉलेजमध्ये असताना कुणालने तीस ते चाळीस मित्रांचा एक ग्रुप तयार केलेला होता. देशामध्ये ज्या वेळी सुनामीच्या संकटाने कहर केलेला होता. त्यावेळी या ग्रुप मधील मित्रांसोबत जाऊन कुणालने त्या भागातील लोकांना मदत केली होती. जास्तीत जास्त तरुणांनी मिलिटरीमध्ये भरती व्हावे, अशी त्याची मनोमन इच्छा होती. त्यामुळे आर्मीमध्ये भरती होण्यासाठी त्याच्याकडे कोणी आले तर त्याला तो सविस्तर माहिती सांगायचा. तासन््तास मार्गदर्शन करीत तो गप्पागोष्टी करीत असे.
मंगळवारी (२९ नोव्हेंबर) तो शहीद झाल्याचे पुण्यातील माझ्या मोठ्या मुलाला आर्मीच्या सीओंकडून भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले. मुलाने लगेचच ही बातमी पंढरपूरला घरी कळवली. तोपर्यंत दूरचित्रवाणीवरून शहीद झाल्याच्या बातम्या दिसू लागल्या. याआधी आसाम, मणिपूरमध्ये तो थेट चकमकीत सहभागी झाला होता. मात्र त्या वेळी समोरच्याचा त्यांनी बीमोड केला होता.
मी त्याचा बाप असणे आहे माझ्यासाठी अभिमानास्पद
गोसावी घराण्यातील कुणाल हा आर्मीमध्ये गेलेला पहिलाच. सोलापूर येथील कॅप्टन बदलानी यांच्या मार्गदर्शनामुळेच तो आर्मीमध्ये मेजर पदावर पोहचला. यावेळी कुणालला देशसेवा करताना हौतात्म्य अाले. कुणाल हा माझा मुलगा असण्यापेक्षा कुणालचा मी बाप आहे याचा मला खरोखर सार्थ अभिमान आहे. देशसेवेला वाहून घेणारी कुणालसारखी मुले प्रत्येक आई-बापांच्या नशिबी यायला हवीत, अशी भावना मुन्नागीर गोसावी यांनी आवर्जून व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे सर्वांच्याच रजा, सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कुणालच्या मेव्हण्याचा अपघात झालेला होता. त्यामध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणालला सुटी दिलेली होती. पुढे दिवाळी असल्याने एक महिन्यापर्यंत त्यांनी ती सुटी वाढविलेली होती. त्यामुळेच या वर्षीची दिवाळी आम्ही सर्वांनी खूपच आनंदात साजरी केली. महिनाभराच्या सुटीमध्ये तो घरच्या सर्व मंडळींसोबत अंबोली, गोवा येथेदेखील गेलेला होता. जणू पुढे असे काही घडणार आहे याची त्याला प्रचिती आल्यानेच पत्नी, मुलीला सोबत घेऊन त्याने सर्व नातेवाईकांच्याही आवर्जून भेटी घेतल्या. कधी नव्हे तो आसपासच्या आमच्या नातेवाईकांनाही तो भेटून आलेला होता.
शहीद कुणालच्या आठवणी....
देशसेवेसाठी आपले प्राण देणाऱ्या शहीद मेजर कुणालचे वडील होण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्यासाठी खरोखरच गौरवास्पद अशी बाब आहे. माझ्या कुणालने देशासाठी आपले प्राण अर्पण केले, यासारखी गौरवास्पद बाब दुसरी कुठलीही नाही. त्यामुळे त्याचा बाप म्हणून त्याने दिलेल्या बलिदानाचा मला सार्थ अभिमान आहे, हे उद्््गार आहेत शहीद कुणाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांचे....
बातम्या आणखी आहेत...