आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार परिचारकांविराेधात पंढरी बंद; अदखलपात्र गुन्हा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची माजी सैनिकांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर  - देश संरक्षणासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांबद्दल अाक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्याविराेधात माजी सैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत. त्यांच्या निषेधार्थ बुधवारी अायाेजित ‘पंढरपूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अामदार परिचारिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  
सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे  येथील प्रचारसभेमध्ये लष्करी जवानांच्या कुटुंबीयांबाबत लांछनास्पद विधान केले होते. या विधानाचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त हाेत अाहे.
 
प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून परिचारक यांनी जाहीर माफीही मागितली. मात्र त्यांच्यावर कारवाईसाठी अाता केवळ जिल्ह्यातीलच नव्हे राज्यभरातील माजी सैनिक अाक्रमक झाले अाहेत. 
 
पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिकांनी बुधवारी बंदचे अावाहन केले हाेते. तसेच त्यांच्यावर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा, अामदारकी रद्द करावी अादी मागण्याही अांदाेलनकर्त्यांनी केल्या.  पंढरपूरमधील शिवाजी चौकात माजी सैनिकांच्या संघटनानी, जवानांच्या कुटुंबीयांनी  आमदार परिचारक यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला. 
 
या आंदोलनामध्ये हजारो महिला-पुरुष सहभागी झाले हाेते. तहसीलदार अनिल कारंडे यांना निवेदन देण्यात आले. माजी सैनिकांच्या पत्नी सुवर्णा मधुकर गायकवाड, पोपटबाई जालिंदर शिवशरण, मीनाताई रवींद्र कदम, विजया बाळू पवार, सुचित्रा भारत उन्हाळे, इंदुमती शंकर जाधव, सुधामती माळी, माजी सैनिक किरण घाडगे, गोपी वाडदेकर, संदीप पाटील, संतोष वाघ, जगदीश पवार, स्वागत कदम आदी सहभागी झाले हाेते.  
 
पाेलिसांमध्ये फिर्याद दाखल  
लष्करी जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अामदार परिचारिक यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी फिर्याद माजी सैनिक लक्ष्मण दिगंबर वाघमारे यांनी करकंब पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून परिचारकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आमदार परिचारक यांनी आपल्या भाषणात गलिच्छ भाषा वापरून संपूर्ण देशभरातील सैनिकांच्या मनोबलाचे खच्चीकरण केले. सर्व सैनिकांच्या भावना दुखावण्यासारखे वक्तव्य केले, असे वाघमारे (वय ५५, माजी सैनिक, रा. कोर्टी ता. पंढरपूर ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...