आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: भाजपचा स्वबळावर महापौर शक्य; सेनेच्या निर्णयाकडे डोळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापौर निवडीसाठी हात वर करून मतदान होणार असल्याने नगरसेवक फुटण्याचा धोका पक्षांसाठी निर्माण होणार नाही. जास्त मते मिळतील, तो महापौर होणार आहे. भाजपकडे ४९ नगरसेवक अाहेत. शिवसेना, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप माकप हे एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या खूपच कमी असल्याने ते एकत्र आले तरीही महापौरपदासाठी भाजपला फारशी अडचण येणार नाही. भाजप स्वबळावर महापौरपद मिळवू शकते. याबाबत तांत्रिक माहिती घेण्याच्या कामाला भाजपचे पदाधिकारी लागले आहेत. 

नव्या नगरसेवकांचे राजपत्र २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका नगरसचिवामार्फत आयुक्तांना अहवाल दिला जाईल. विभागीय आयुक्त पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती होऊ शकते. पीठासीन अधिकारी पहिली सभा बोलवतात. त्यापूर्वी तीन दिवस आधी महपौरपदासाठी अर्ज मागवण्यात येतील. त्यांची छाननी होऊन अर्ज मागे घेण्याची मुदत निवड प्रक्रियेपूर्वी अर्धा तास अगोदर असेल. गरज पडल्यास पहिल्या सभेत महापौरपदासाठी हात वर करून मतदान घेण्यात येईल. 
 
‘स्थायी’ची निवड पहिल्या सभेत 
स्थायी समिती सदस्य निवड पहिल्या सभेत होईल. पक्षीय बलाबलानुसार सदस्यांमागे एक सदस्य स्थायी समितीत जाईल. परिवहन समितीत त्याप्रमाणे सदस्य निवडण्यात येतील. पहिल्या सभेत स्थायी परिवहन सदस्य निवड होण्याची शक्यता अाहे. 
 
 महापौर पदाचे दावेदार 
अंबिका पाटील दोन वेळा निवडून आल्या असून, त्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विश्वासातल्या आहेत. शोभा बनशेट्टी या तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांना पूर्वी विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. शशिकला बत्तुल या शिक्षिका असून, दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. श्रीकांचना यन्नम या सलग तीन वेळा निवडून आल्या. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो. त्यांचे जावई देवेंद्र कोठे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. संगीता जाधव या शिक्षिका असून, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. वक्तृत्वावर प्रभुत्व असल्याने काँग्रेसच्या विद्यमान महापौरांचा पराभव करून निवडून आल्या आहेत. याशिवाय इतर नगरसेविका आपल्या पद्धतीने दावा करत आहेत. 
 
सभागृहाचे कामकाज अवघड
भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली तर शिवसेना विरोधी पक्ष म्हणून बसेल. सभागृहात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत नसल्याने कामकाज चालवणे अवघड जाणार आहे. इतर लहान पक्षांना सोबत घेतल्यास काहीसे सोपे होऊ शकेल. मात्र, शिवसेनेत गणेश वानकर, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, गुरुशांत धुत्तरगावकर, लक्ष्मण जाधव, उमेश गायकवाड यांच्याकडे मनुष्यबळ आहे. महापालिकेची परिस्थिती पाहता सेना वारंवार आंदोलन करेल. ते भाजपस डोकेदुखी ठरू शकतात. शिवसेना सोबत गेल्यास विरोधी काँग्रेस आदी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या किरकोळ असणार आहे. त्यांच्याकडून प्रभावी विरोध होऊ शकणार नाही. शिवसेनेला सोबत घेणे भाजपला फायदेशीर ठरणार आहे. 
 
विद्यमान महापौरांची मुदत मार्चपर्यंत 
विद्यमान महापालिका सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च रोजी संपुष्टात येणार असून, त्यापूर्वी महापौर उपमहापौर निवड होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्यानुसार तयारी सुरू केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...