आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाजपत्रक एकमताने मंजूर होण्याच्या दिशेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्वपक्षीय गटनेत्यांचे वॉर्ड विकास निधीच्या रकमेवर एकमत झाले. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, निर्णय सोमवारी दुपारी चार वाजता जाहीर करणार असल्याचे विरोधकांनी सांगितले. तब्बल तीन महिन्यांनंतर नवख्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्या अंदाजपत्रकाची सभा आता होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. 
 
महापालिका सभागृह नेत्यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांची रविवारी बैठक झाली. शहराकरिता ६० आणि हद्दवाढ भागाकरिता ७० लाख रुपये विकासनिधी देण्याचे निश्चित होईल, असा अंदाज आहे. 

शिवसेनेचे गटनेते महेश कोठे यांनी हद्दवाढ भागाला एक कोटी आणि शहर भागाला ७५ लाख रुपये विकास निधी द्यावा, अशी मागणी केली होती. तर काँग्रेसने ७० लाख आणि ६० लाखांची मागणी केली होती. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अधिक निधी देण्याची मागणी भाजपच्याच काही सदस्यांनी केली होती. सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता. 

महापौरांची नाराजी, कक्षात परतल्या 
सुरेश पाटील, अॅड. यू. एन. बेरिया, चेतन नरोटे, महेश कोठे, नूतन गायकवाड, आनंद चंदनशिवे आदींनी चर्चेत भाग घेतला. ही बैठक पक्षनेत्यांच्या आतील कक्षात झाली. बाहेरील कक्षात स्थायी सभापती संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे होते. महापौर शोभा बनशेट्टी आल्या आणि बाहेरील कक्षात बसल्या. महापौरांनी नाराजी व्यक्त करीत ‘सर्वजण आत तर मी बाहेर बसून काय करू?’, असा पवित्रा घेत महापौर कक्षात परतल्या. त्यांना फोनवरून संपर्क साधून बोलावून घेण्यात आले. त्यानंतर सर्वच आत गेले आणि चर्चा झाली. 

बंद खोलीत चर्चा 
शहराच्या विकासाच्या नावाखाली गटनेत्यांची चर्चा बंद खोलीत झाली. दारावर आतून आणि बाहेरून एक शिपाई तैनात करण्यात आला होता. दोन तास चर्चा झाली. चर्चेेचा तपशील मात्र सांगण्यात आला नाही. चर्चा सकारात्मक झाली. सोमवारी निर्णय जाहीर करू, अशी त्रोटक माहिती देण्यात आली. वॉर्ड विकास निधीनंतर सूचना, शिफारशींवर चर्चा झाली. मिळकतींचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाला असून, तो योग्य आणि पारदर्शी पद्धतीने झाल्यास उत्पन्न वाढेल, असे काँग्रेसने सांगितले. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना समान निधी दिला जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...