आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारही प्रमुख पक्षांना यशाची खात्री; राष्ट्रवादीसह सेना, भाजप, काँग्रेसलाही पडताहेत सत्तेची स्वप्ने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गावगाडा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी बळ देणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कोण जिंकणार, विधानसभेची रंगीत तालीम असलेली ही संस्था कुणाच्या ताब्यात येणार, जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार, कोण-कोणाची मदत घेणार, अशा अनेक प्रश्नांभोवती चर्चा सुरू झाली आहे. मतदारांची चर्चा, त्यावर लागणाऱ्या पैजा, हा मुद्दा गौण असला तरी प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या प्रमुख तीन पक्षासह राष्ट्रवादीलाही ही निवडणूक आपल्याला यशप्राप्ती देणारी आहे, असा ठाम विश्वास वाटतो. सर्वच पक्ष आम्हीच सत्तेत असू, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. गुरुवारी (दि.२३) मतमोजणी असून, त्यानंतर कोण-कुठे असणार हे स्पष्ट होणार आहे. 
 
गेल्या दहा वर्षांपासून म्हणजे जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुका काँग्रेस-शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांसोबत हातमिळवणी करून लढविल्या. परिणामी प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यात उपरोक्त तिन्ही पक्षांना यश आले.
 
राज्य स्तरावरूनच शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र मैदानात उतरले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत छुपी युती करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळेच उपनेत्याने िशवसेनेची काँग्रेससोबत आघाडी निश्चित झाल्याचे सुतोवाच केले होते. अखेर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले आणि शिवसेनेसोबतची आघाडी फिस्कटली. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, या तिन्ही पक्षांना स्वबळावर लढण्याची वेळ आली. राष्ट्रवादीनेही अन्य पक्षासोबत लढता नेहमीप्रमाणे स्वबळावर शड्डू ठोकले. यावेळी प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या आणि तुलनेने पक्ष कार्यकर्त्यांची संख्या कमी असलेल्या भारतीय जनता पक्षाने कमालीची फिल्डिंग लावली. प्रत्येक मतदारसंघात म्हणजे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ५४ जागांवर उमेदवार दिले तर एका जागेवर मित्रपक्ष असलेल्या रासपचा उमेदवार उभा केला. पंचायत समितीसाठी ११० पैकी १०६ उमेदवार उभे करून अवघ्या काही दिवसांत यंत्रणा उभी केली. तुलनेने शिवसेनेत पदाधिकाऱ्यांमध्ये अचानक बदल झाल्याने तसेच सगळ्याच तालुक्यात निष्ठावानांमध्ये नाराजीचा सूर असल्याने गोंधळ उडाला. काही ठिकाणी बाहेरून अालेले उमेदवार देण्यात आले तर तासात पक्ष बदलून गळ्यात भगवा रूमाल घालणाऱ्यांना पालिकेप्रमाणे यावेळीही महत्त्व देण्यात आल्याने सेनेत उभी फूट पडली. त्याचा काहीसा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेवर ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास वाढल्याचे सांगून पक्षाला ३१ जागा मिळतील, असा दावा प्रभारी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे यांनी केला आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार बसवराज पाटील यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यांच्या भाषणाचा प्रभाव मतदारांवर तसेच ग्रामीण जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पािलकेच्या निवडणुकीत भुईसपाट झालेली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने गटबाजी होऊ देता स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबविली. खासदार सुप्रियाताई सुळे वगळता मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नसल्या तरी पालिकेच्या निवडणुकीप्रमाणे जोरदार यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतो. जिल्हा परिषदेत ५५ जागा असून, बहुमतासाठी २८ जागांची गरज आहे. गेल्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप मिळून सत्तेत सहभागी होते. 
 
कुणाला काय वाटते? 
- राष्ट्रवादी- एकहाती सत्ता मिळेल. गतवैभव देणार. 
- भाजप- सदस्य संख्या दोन अंकी होईल,सत्तेत सहभागी.{शिवसेना-झेडपीत ३१ जागा मिळतील, पं.स.मध्ये यश. 
- काँग्रेस- अध्यक्ष होईल, सेनेमुळे तोटा झाला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा परिणाम होईल : भाजप...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...