आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर बँकांना चलन पुरवणाऱ्या एसबीआयमध्येही खडखडाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इतर बँकांना चलन पुरवणाऱ्या स्टेट बँकेतही मंगळवारी खडखडाट निर्माण झाला. चलनच नसल्याने जिल्ह्यातील इतर शाखांमधून पैसे आणून व्यवहार सुरू ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खात्यावरील पैसे मागणाऱ्या ग्राहकांना फक्त दोन हजार रुपये अदा करण्यात आले. चलन अाल्याशिवाय या स्थितीत सुधारणा होणार नाही, असेही अधिकारी म्हणाले.
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेकडे चलन पाठवले. त्याचे योग्य नियोजन करून या बँकेने इतर बँकांनाही चलन पुरवले होते. आता सर्व बँकांतील चलन संपुष्टात आले आहे. रोखीचे व्यवहार करण्यासाठी बँकेकडे चलन उरले नाही. खात्यावरील मोठ्या रकमांवर निर्बंध घातले. संबंधितांना विनंती करून फक्त दोन हजार रुपयांवरच त्यांचे समाधान केले जात आहे. तीन दिवसांची सुटी घेऊन आलेल्या सर्वच बँकांमध्ये मंगळवारी खडखडाट होता.

बाळीवेस येथील स्टेट बँकेच्या ई-गॅलरीत प्रचंड गर्दी होती. एटीएम केंद्रासमोर मोठी रांग लागलेली होती. सिद्धेश्वर पेठेतील ट्रेझरी शाखेसमोरही अशीच स्थिती होती. तिथे रात्री आठपर्यंत मोठी रांग होती. पैशाचा भरणा केल्यानंतर काही तासांतच पैसे संपत होते. प्रत्येक ग्राहकाला फक्त दोन हजार रुपयांची नोटच मिळत आहे. परंतु रांगा मोठ्या असल्याने पैसे पुरत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली.
नवीन चलनानंतरच बँक व्यवहार सुधारेल
^चलनतुटवड्यामुळे रोखीचे व्यवहार करणे कठीण झाले. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील इतर बँकांना पुरवलेले चलन आणतो आहोत. त्यातून देणेकऱ्यांना दोन हजार रुपयेच देतो अाहोत. मंगळवार दोन एटीएम सुरू केले. तिथे भली मोठी रांग होती. नवीन चलन आल्यानंतरच स्थितीत सुधारणा होईल. पण, ते कधी येईल याचा काहीच निराेप नाही. सुहास गंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक

आज लागणार डीसीसीचा निकाल
नाेटाबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले अाहेत. त्यामुळे या बँकेतील व्यवहार ठप्प झाला. रद्द झालेल्या नोटा ठेव म्हणून घ्यायचे नाही, बदलूनही द्यायचे नाही, असे हे निर्बंध आहेत. त्याच्या विरोधात या बँकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली. बुधवारी त्यावर निकाल होईल. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.
मागील तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी स्टेट बँक ट्रेझरी शाखेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होती.
बातम्या आणखी आहेत...