आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीतून कारवाई : बेकायदेशीर कत्तलखान्यातून सव्वादोन टन मांस जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरातील खिरणीमळा येथे चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर नगरपालिका पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून दोन टन ३०० किलो मांस जप्त केले. गुरुवारी (दि. २) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कत्तलखान्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सुरू होता. अनेक दिवसांपासून या कत्तलखान्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. नगरपालिकेने हा कत्तलखाना बंद करण्याबाबत ठरावही घेतला आहे. 
 
शहरातील खिरणीमळा परिसरात बेकायदेशीर कत्तलखाना सुरू आहे. यासंदर्भात कारवाई करून कत्तलखाना बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे नगरपालिका प्रशासन पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा येथे छापा मारला. तेव्हा तेथे जनावरांची कत्तल करून मांस अन्य ठिकाणी पाठवण्याचे काम सुरू होते. पोलिस कर्मचाऱ्याला पाहून तेथील मजूरांनी पलायन केले.
 
कारखान्यात सर्वत्र जनावरांची कत्तल करून मांस पोत्यात भरले जात होते. पोलिस नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सर्व मांस जप्त केले. यावेळी दोन टन ३०० किलो मांस हस्तगत करण्यात आले आहे. बाजारातील याची किंमत दोन लाख ५३ हजार रुपये आहे. यावेळी शौकत हमीद कुरेशी, सागर कबीर गायकवाड यांंना अटक करण्यात आली. कारवाईसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. उल्लागोंडावार, उत्तम जाधव, हवालदार आय. एम. कुरेशी, दशरथ कुंभार, नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक एस. बी. कांबळे, कामगार उल्हास झेंडे, आकाश शिंगाडे, अजिंक्य जानराव, संदिपान वाळवे यांनी पुढाकार घेतला. 

जप्त केलेल मांस नगरपालिकेच्या वतीने नष्ट करण्यात आले आहे. यातील मासांचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पकडलेले मास गोवंशाचे असेल तर गाेवंश हत्या बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ही कारवाई नगरपालिका अधिनियम १९६५ कायद्याच्या कलम २६९ नुसार तसेच पशुसंरक्षण अधिनियमाच्या कलम पाच पाच नुसार कारवाई करण्यात अाली आहे. 

दरम्यान आता कत्तलखाना कायमचा बंद करण्यासाठी नगरपालिकेतर्फे पावले उचलण्यात येत आहेत. दोन दिवसांमध्ये कारखान्याला कायमचे सील ठोकण्यात येणार असल्याचे समजते. 
दुर्गंधीमुळेनागरिकांना त्रास :कत्तलखान्यातील मांस हाडे उघडल्यावर ठेवण्यात येत होते. याप्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना नागरिकांना लहान, मोठ्या आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. 
 
अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी 
मांस, हाडे टाकण्यात येत असल्यामुळे अनेक नागरिक या भागात फिरकत देखील नव्हते. खिरणीमळा म्हणजे कत्तलखान्याचा परिसर असे समीकरण रुढ झाले होते. परिसरातील काही नागरिकांकडून हा कत्तलखाना बंद करण्याची जुनी मागणी करण्यात येत होती. 

सतत नजर, माेहिमेत हवे सातत्य 
कारवाई नंतर पोलिसांकडून पुन्हा विशेष लक्ष दिले जात नाही. यामुळे कत्तलखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यावर कायमचे निर्बंध घालण्याची गरज आहे. यासाठी पोलिस नगरपालिका विभागाचे या भागात सातत्याने नजर ठेवणे आवश्यक आहे. 

अन्य ठिकाणी स्वच्छता 
खिरणी मळाभागातील कत्तलखान्याचा परिसर सोडला तर अन्य भागात नगरपालिकेने व्यवस्थित स्वच्छता ठेवली आहे. सातत्याने नाल्यातील सफाई करण्यात येते. नाल्यांच्या जवळ काढलेला मैला दुसरीकडे टाकण्यात येतो. रस्तेही स्वच्छ ठेवण्यात येतात. पाणंदमुक्त शहर संकल्पनेतून येथे वैयक्तिक स्वच्छतागृहांचे कामही करण्यात आले आहे. मात्र, कत्तलखान्यामुळे हा परिसर बदनाम झाला आहे.त्यामुळे या भागातील कत्तलखाने हलविण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. सत्ताधारीही त्यासाठी सज्ज झाले आहेत.