आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी तलावातून पहिल्या दिवशी 20 ट्रॉली भरून जलपर्णी काढली, मनपा, पदाधिकारी, संस्था, युवकांचा सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संभाजी तलावातील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेस शनिवारी सकाळी सुरुवात झाली. - Divya Marathi
संभाजी तलावातील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेस शनिवारी सकाळी सुरुवात झाली.
सोलापूर- संभाजी तलावातील जलपर्णीचा खच दूर होण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. जलपर्णी काढण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. दिवसभरात सुमारे २० ट्राॅली जलपर्णी काढण्यात आली. 
 
तलाव सफाई मोहिमेस महापालिकेने सुरुवात केली असून, त्यास विविध मंडळे, संस्था मदत करत आहेत. दरम्यान, आणखी संस्था, संघटना आणि नागरिकांनी या कामी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ दोन तास श्रमदान करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
तलावात जलपर्णी साचल्याने तलाव आहे की मैदान हे समजत नव्हते. यामुळे ३१ मार्च रोजी ‘दिव्य मराठी’त याबाबत छायाचित्र प्रसिद्ध केले होते. श्रमदानातून सफाई मोहिमेस महापालिकेचे सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळींसह इतरांनी होकार दिला. 
 
महापौर शोभा बनशेट्टी यांनी सकाळी साडेसहा वाजता तलाव परिसरात येऊन श्रमदान केले. त्या सुमारे दोन तास तेथे थांबून होत्या. उपमहापौर शशिकला बत्तुल यांनीही श्रमदान केले. श्री. पाटील यांनी सुमारे ७० कार्यकर्ते सोबत घेऊन सुमारे एक तास श्रमदान केले. श्री. कोळी यांनी जागृती तरुण मंडळाचे ८० कार्यकर्ते घेऊन श्रमदान केले. साहित्य कमी पडत असल्याने तत्काळ त्यांची सोय करून अतिरिक्त मशीन मागवल्या. 
 
नगरसेवक सुनील कामाठी यांनी खड्डा तालीम तरुण मंडळाचे २५ कार्यकर्ते आणून अशक्य असलेले काम त्यांनी शक्य करत, कोणाचीही अपेक्षा करता स्वत: साहित्य आणून श्रमदान केले. एक ट्रक गाळ त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढला. नगरसेवक संतोष भोसले यांच्या मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगरसेवक श्रीनिवास करली, डाॅ. राजेश आणगेरी, अविनाश पाटील, राजकुमार पाटील यांनी श्रमदानात सहभाग नोंदवला. 
 
अधिकारी कामाला लागले 
महापालिकेचे अधिकारी काम करताना दिसून आले. नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, स्वच्छता अधीक्षक संजय जोगदनकर, आराध्ये, झोन अधिकारी नीलकंठ मठपती आदींचा यात सहभाग होता. पण शासन नियुक्त असलेले अधिकारी उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहायक आयुक्त अभिजित हरळे फिरकले नाहीत. 
 
उद्यान’ बघ्याच्या भूमिकेत 
जलपर्णी काढण्याच्या कामात उद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका बाजूला थांबून फक्त बघ्याची भूमिका घेतली. 
 
मोहिमेसाठी लोकसहभागाची आणखी गरज 
-जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू राहील. पण यात लोकसहभाग आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, तरुण मंडळे, महिला बचत गट, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आदींनी शहरासाठी दोन तास वेळ द्यावा. त्यामुळे जलपर्णी निघेल आणि सौंदर्यात भर पडेल.” संजय कोळी, मनपा स्थायी समिती सभापती 
 
साहित्याची कमतरता 
महापालिका प्रशासनाने जेसीबी, ट्रॅक्टरची सोय केली हाेती. हॅन्डग्लोज, मास्क आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून दोन जीवरक्षक, अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, डाॅक्टर, रुग्णवाहिका तैनात होती. मात्र, जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे लाकूड, पंजा आदी साहित्य नव्हते. जलपर्णी बाजूला आणण्यासाठी एका बोटीची व्यवस्था आवश्यक होती. 
 
बातम्या आणखी आहेत...