आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेक करण्यावरून वाद; न्यायाधीशांना सळईने मारहाण, सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यासह चारजणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - न्यायालयातील काम संपवून घरी निघालेले कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्याम रुकमे यांना किरकोळ कारणावरून चार जणांनी भररस्त्यात लाथाबुक्क्या, लोखंडी सळईने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी पत्रकार भवन चौकाजवळ घडला. विशेष म्हणजे आरोपींनी चुकीच्या दिशेने आपली चारचाकी गाडी दामटली आणि न्यायाधीशांच्या गाडीसमोर उभी केली होती. न्यायाधीशांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. चारजणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
 
महादेव मलेशप्पा कुदरे, दीनदयाळ ज्ञानेश्वर गुंड, नितीन मुरलीधर अंबुरे, संतोष शिवशंकर मसले (रा. सर्व सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित एका सहकारी बँकेचे अधिकारी कर्मचारी आहेत.
 
श्याम नागनाथराव रुकमे (वय ४६, रा. सिव्हिल लाइन्स कोर्ट क्वार्टर्स) हे जून २०१४ पासून कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी काम संपल्यानंतर ते कार (एमएच २४, एफ ०४१०)मधून घरी जात होते. सात रस्ता चौकातून विजापूर रस्त्याकडे जाताना टाटा सुमो (एमएच १२. एक्स ६८९३) ने चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यातून वाद सुरू झाला. सुमो चालकासह चौघांनी दमदाटी सुरू केली. 
 
यातील दाढीवाल्या व्यक्तीने, “तू एमएच २४ आहेस. सोलापुरात येऊन मला शिकवतोस का’ असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. न्यायाधीश खाली कोसळले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. टाटा सुमोच्या चालकाने गाडीतील लोखंडी सळई आणून मारहाण केली. न्यायाधिशांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या बाेटांना गंभीर जखमा झाल्या. 
 
पोलिसांसमोर मग्रुरी 
ही मारहाण सुरू असताना चौकात तैनात असलेले पोलिस कर्मचारी जगताप आणि अॅड. पुजारी न्यायाधीशांच्या मदतीसाठी धावले. न्यायाधीशांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. हे सांगत असताना दाढीवाल्या आरोपीने “मी नामांकित मल्टिनॅशनल बँकेचा वसुली अधिकारी आहे, कोणी आमचे काही करू शकणार नाही’ अशी मग्रुरीची भाषा केल्याची फिर्याद न्यायाधीशांनी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...