आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 तास चर्चा, कर्जमाफीच्या ठरावाविना गुंडाळली सभा; नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- चार वर्षांनंतर शुक्रवारी (दि. २८) पंचायत समितीची आमसभा झाली. तीन तासांहून अधिक वेळ ही सभा चालली. अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी शेतीकर्ज वीजबिलमाफीचा ठराव करणार असल्याचे सांगितले. परंतु यात यासह कोणताही ठराव झाला नाही. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना सावरून घेत वेळ मारून नेली. तसेच सभा अर्ध्यावरच गुंडाळली. विधानसभेतील कामकाजाचा तगडा अनुभव असलेल्या गणपतराव देशमुख, शिंदे या आमदारांसमोर प्रश्नांना उत्तरे देताना तहसीलदारांपासून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. 

याप्रसंगी आमदार भारत भालकेही उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता. सुरुवातीला करकंब गटातील विविध गावांचा आढावा घेण्यात आला. या वेळी सरपंच, पंचायत समिती सदस्यांसह ग्रामस्थांनी अडचणी मांडल्या. त्यानंतर विभागिनहाय अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. शेतकरी, ग्रामस्थ अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना धारेवर धरत होते. अनेकांनी कागदपत्रे दाखवत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा उघड करत रेंगाळलेल्या कामांविषयी सवाल विचारला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. परंतु आमदार देशमुख, शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधीतून मिळालेली माहिती, शासन आदेशाची माहिती अधिकाऱ्यांना देत प्रश्नांचे निरसन केले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा प्रकर्षाने समोर येऊ शकला नाही.
 
काही मंडळींनी रस्ते, वीज, पाणी अन्य मूलभूत सोयीसुविधांऐवजी अधिकाऱ्यांर दबाव निर्माण करण्यासाठी वाळू, ट्रान्स्फाॅर्मर चोरी, दुष्काळी अनुदान, पीकविमा, ठिबक सिंचन अनुदान, शेतकरी कर्जमुक्ती अशा प्रश्नांवर जास्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर, शिवसेनेचे राहुल पाटील, विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, पंचायत समिती सदस्या मुबिना मुलाणी यांंनी प्रश्न विचारले.
 
ठिबकसिंचन अनुदानाचे १५ दिवसांत वाटप...
३१ मार्च रोजी ठिबक सिंचन अनुदान आले आहे. येत्या १५ दिवसांत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. दुष्काळी अनुदानापोटी १०६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासाठी एक लाख ३२ हजार ५१५ शेतकरी पात्र आहेत. 

अधिकाऱ्यांनो, खोटी माहिती देऊ नका 
संजयगांधी निराधार, श्रावणबाळ, अपंगांसठीच्या योजनांचे अनुदान जमा झाल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यावर तुमच्या पगाराचा बीडीएस दरमहा काळजीपूर्वक निघतो, पण विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा बीडीएस का निघू शकत नाही, असा सवाल आमदार देशमुुख यांनी तहसीलदारांना विचारला. अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केल्यास लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच भारत भालके यांनी वेळ मारून नेण्यासाठी खोटी माहिती देऊ नका, असे अधिकाऱ्यांना बजावले. 
बातम्या आणखी आहेत...