आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरीतही टोकन पद्धतीने माेफत दर्शन कार्तिकी यात्रेपासून हाेणार सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांना तासन‌् तास तिष्ठत थांबावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्येही टोकन सुविधेद्वारे माेफत दर्शनाची साेय उपलब्ध हाेणार अाहे. कार्तिकी यात्रेपासून त्याची सुरुवात हाेईल, अशी माहिती   मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.  मंदिर समितीच्या सदस्यांची मासिक बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. 
    
डॉ. भोसले म्हणाले, श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना कित्येक तास दर्शन रांगेमध्ये थांबावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शनाची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी भाविकांना दर्शनाचे टोकन वितरणाची सोय केली जाईल. या सुविधेसाठी येणारा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे या सुविधेसाठी भाविकांना आणि मंदिर समितीला एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही.    

पंढरपूर शहर कायमस्वरूपी स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसर,भक्तिमार्ग आणि विशेषकरून चंद्रभागेचे वाळवंट आदी भागाची स्वच्छता मंदिर समितीमार्फत केली जाणार आहे. यासाठी मंदिर समिती लवकरच स्वच्छतेच्या कामाचा ठेका देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवणार आहे. देशातील किंवा राज्यातील स्वच्छतेची कामे करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना टेंडर प्रक्रियेतून ठेकेदार म्हणून नियुक्त केले जाईल.
   
पंढरपुरातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि पालिकेचे रुग्णालय मंदिर समितीला चालवण्यासाठी देण्याचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाने मंदिर समितीच्या या प्रस्तावास मंजुरी दिल्यास या दोन्ही रुग्णालयांतून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून या रुग्णालयामध्ये नामवंत डॉक्टरांच्या सुविधा मंदिर समिती उपलब्ध करून देणार असल्याची त्यांनी माहिती दिली.   
 
भव्य अन्नछत्र उभारणार  
विठ्ठल मंदिरात लवकरच आणखीन पुजारी नियुक्त केले जातील. एफडीएच्या नियमांना अधीन राहून लवकरच लाडू प्रसाद बनवण्याच्या कामाचे आऊटसोर्सिंग केले जाईल.  सध्याचे एमटीडीसीचे पर्यटन निवास (भक्तनिवास) सहा एकर जागेसह भाडेपट्टा वाढवून घेऊन त्या ठिकाणी मंदिर समिती सुसज्ज अन्नछत्र तसेच संतपीठाचे मुख्यालय उभारणार. संत विद्यापीठाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी यासाठी पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार. ही समिती अभ्यास करून (विद्यापीठाच्या दर्जासह) तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करणार. भक्तनिवासाच्या कामांची पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करणार. या पाहणीत जर भक्तनिवासाचे निकृष्ट काम झाल्याचे निदर्शनास आले तर त्या कामाची देयके (बिले) काढली जाणार नाहीत, असेही डाॅ. भाेसले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...