आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमास विरोधी गट गैरहजर; शिस्तीचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपात बेदिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिस्तीचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपमधील बेदिली रविवारी पुन्हा एकदा दिसून आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह १६ नगरसेवकांनी पाठ फिरवली. ही मंडळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक मानली जातात. अर्थात कार्यक्रम त्यांच्या विरोधी गटाच्या म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा होता. 

स्वीकृत नगरसेवक पदाच्या भाजपच्या दोन्ही जागांवर पालकमंत्र्यांच्या समर्थकांची वर्णी लागली. तेव्हापासून सहकारमंत्र्यांचा गट अस्वस्थ आहे. विशेषत: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पत्र आणूनही अविनाश महागावकर यांची नियुक्ती नाही झाली. ही गोष्ट या गटाच्या खूपच जिव्हारी लागली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारीच सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकारी आणि १६ नगरसेवकांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली होती. तीत गटबाजी नको, असा सल्ला सहकारमंत्री देशमुख यांनी दिल्याचे सांगण्यात आले होते. त्याचा काहीच प्रभाव पडला नसल्याचे पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद््घाटनाप्रसंगी दिसून आले. त्यामुळेच विकासकामात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

सर्वकार्यकर्त्यांनी योगदान द्यावे : पंकजा मुंडे 
सोलापूरच्याभाजप कार्यकर्त्यांनी समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी यापूर्वीही आपले योगदान दिले असून, पुढेही असेच योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयातून प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी केली. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे आता शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आता दिल्ली ते गल्लीपर्यंत आपलीच सत्ता आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ पातळीवरून जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. 

मंचावर महापौर शोभा बनशेट्टी, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, उपमहापौर शशिकला बत्तुल, पक्षनेता सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्यासह पालकमंत्री गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. या वेळी स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
बातम्या आणखी आहेत...