Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about protest in solapur

हलगीनाद कुणीच नाही ऐकला, निवेदन शेवटी गेटला डकवले

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 10:55 AM IST

कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात यंत्रमागावरील ‘उत्पादन बंद’चा सोमवारी तिसरा दिवस होता. दिवाळीच्या तोंडावर रस्त्या

 • news about protest in solapur
  सोलापूर- कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात यंत्रमागावरील ‘उत्पादन बंद’चा सोमवारी तिसरा दिवस होता. दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर आलेल्या कामगारांनी हलग्या वाजवून कारखानदारांचे लक्ष वेधले. परंतु ते ऐकण्यासाठी कोणीच आले नाहीत. निवेदन देण्यासाठी संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयासमोर गेले. तिथे कोणीच पुढे आले नाहीत. त्यामुळे गेटलाच ते डकवण्यात आले. कारखानदारांचा धिक्कार करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत कामगार परतले.

  दुसरीकडे मनसेप्रणीत कामगार संघटनेने सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. प्रचंड घोषणा देत कामगारांनी त्यात सहभाग घेतला. कारखानदारांनी तातडीने उत्पादन सुरू करावे, कामगारांना दिवाळी बोनस द्यावा, भविष्य निधी आणि बंद काळातील वेतन देण्याची मागणी या वेळी केली. त्याची दखल घेतली नाही तर मंगळवारी आक्रोश माेर्चा काढणार असल्याचा इशारा दिला. अक्कलकोट रस्ता एमअायडीसीत कृती समिती तर शहरात मनसेने हे आंदोलन पेटवले होते. कृती समितीच्या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी केले.

  संयुक्त कृती समितीच्या वतीने यंत्रमाग संघाच्या कार्यालयासमोर तर मनसे प्रणीत संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  वस्त्रोद्योगमंत्री देशमुख, कारखानदारांची बैठक
  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी दुपारी कारखानदारांना बोलावून घेतले. कारखानदारांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. ‘यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ’ स्थापन केल्यास हा प्रश्नच सुटेल, असे ते म्हणाले. देशमुखांनी त्यांचे शांतपणे ऐकून घेतले. पुढे काय करायचे, हे ठरवू म्हणाले. कामगार राज्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख हेही मोठी भूमिका बजावू शकतात. परंतु सध्या तरी ते गप्प आहेत.

  लाल-भगवे झेंडे एकत्र
  १.कामगारांच्या या लढ्यात माकप आणि शिवसेना एकत्रित लढा देत आहे. लाल आणि भगवे झेंडे एकत्र लावण्यात आले. ते घेऊन कार्यकर्ते कामगार आंदोलनात सहभागी होते.
  २.संपूर्ण एमआयडीसीत यंत्रमागांची धडधड बंद होती. कामगार नसल्याने शुकशुकाट होता. त्यांना नाष्टा, चहापानाची व्यवस्था करणारे टपरीचालकही काळजीत असल्याचे दिसून आले.
  ३.यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात तरुण कारखानदार एकत्र आले होते. भविष्य निधीच्या कायद्याच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची तयारी त्यांनी दाखवली.
  ४.काही ठिकाणच्या कारखान्यांत उत्पादन सुरू असल्याची कुजबूज झाली. त्यानंतर तरुण कारखानदारांनी तिकडे धाव घेतली. एकी कायम ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.

Trending