आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एकच संयुक्त फॉर्म भरा, भविष्य निधीतून रक्कम काढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढणे म्हणजे खूपच झंझट. पहिल्यांदा १०, नंतर १९ त्यानंतर ३१ अशा क्रमांकाचे फॉर्म भरायचे. संबंधित आस्थापनेचा सही शिक्का घ्यायचा. त्यानंतर चकरा मारायच्या....आता अशी वेळ येणार नाही. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तिन्ही फॉर्मचे संयुक्त एकच फॉर्म करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याला संबंधित कर्मचाऱ्याच्या संस्था, संचालक यांच्या ‘अटेस्टेशन’ची गरज नाही. त्याच्या पुढचे म्हणजे या फॉर्मसोबत कुठल्याच कागदपत्रांचीही गरज नाही. 
 
भविष्य निधी कार्यालयाने सदस्यांच्या (कामगार, कर्मचारी) सोयीसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या. त्यातील हे अतिशय महत्त्वाचे आहे. जमा झालेल्या आपल्याच रकमेतून काही रक्कम काढण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत असे. ही प्रक्रिया आता अतिशय सुलभ करण्यात आली. रक्कम काढण्यासाठी एकच संयुक्त फॉर्म भरायचा. त्यावर ‘यूएएन’ (युनिव्हर्सल अकौंट नंबर) आणि आधार क्रमांक द्यायचा. फॉर्म दाखल केल्यानंतर काही तासांतच रक्कम संबंधित सदस्याच्या खात्यावर जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली. 
घरबांधणी, फ्लॅट खरेदी, मुलांचे लग्न, परदेशवारी यांसाठी भविष्य निधीतून रक्कम काढता येते. त्याचा व्याजदर अत्यल्प आहे. त्यामुळे ते सर्वांनाच परवडणारे असते. याच कामांसाठी बँकेतून रक्कम काढणे म्हणजे दिव्यच असते. खासगी अाणि सहकारी बँकांमध्ये ‘प्रोसेस फी’च्या नावाखालीच हजारो रुपये मोजावे लागतात. पुढे हप्ता चुकला, की दंडही भरावा लागतो. 

भविष्य निधीचे तसे नाही. त्यामुळे १५ ते २० वर्षे सेवा बजावणारे भविष्य निधीचे सदस्य आपल्याच निधीतून रक्कम काढण्यास पहिली पसंती देतात. ही प्रक्रिया थोडीशी किचकट होती. परंतु बँकेतील ‘एफडी’वरील ‘आेडी’ (स्वत:च्याच ठेव रकमेतून कर्ज रूपाने पैसे घेणे) काढण्याइतके ते आता सोपे झाले आहे. 

एकच फाॅर्म भरा, निश्चिंत राहा... 
^भविष्य निधीतून रक्कम काढण्यासाठी तीन फॉर्म गरजेचे होते. शिवाय संबंधित संस्था, संचालक किंवा मालकांचे अटेस्टेेशन महत्त्वाचे होते. इथेच अनेकांची गोची व्हायची. या सर्व अटी काढून टाकल्या. संबंधिताचा यूएनए अन् आधार क्रमांक भरलेला एकच अर्ज भरा. निश्चिंत राहा. डॉ.हेमंत तिरपुडे, विभागीय अायुक्त, भविष्य निर्वाह निधी 

 
 
बातम्या आणखी आहेत...