आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचा निर्णय; उस्मानाबादच्या सार्वजनिक जागा डिजिटलमुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरात सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर डिजिटल फलक लावण्यास नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच बंदी घातली. यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणची फलक काढली असून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. या निर्णयाची सातत्यपूर्ण अंमलबजावणीची आवश्यकता आहे. 
 
पूर्वी कापडावर किंवा भिंतींवर रंगवून जाहिरात केली जात होती. राजकीय व्यक्तींचा प्रचार, त्यांच्या शुभेच्छा, सण, उत्सवानिमित्तच्या शुभेच्छा कापडी बॅनरचा उपयोग करून दिल्या जात होत्या. काही ठिकाणी यासाठी कागदी पोस्टरचा उपयोग केला जात होता. यानंतर डिजिटल फलकाचे युग सुरू झाले. स्वस्तात फलक उपलब्ध होत असल्यामुळे याचे फॅड वाढत गेले. उस्मानाबाद येथे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, दर्शनी भागात बांबू रोवून फलक लावण्याची स्पर्धा सुरू झाली. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ लागला. काही ठिकाणी वळणावर समोरचे वाहन लवकर दिसत नसल्यामुळे अपघातही झाले. बसस्थानकाजवळचा सांजाकडे जाणारा रस्ता, लेडीज क्लब, बार्शी नाका, काळा मारुती चौक आदी ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले. या प्रकारामुळे नगरपालिकेने १५ दिवसांपूर्वी असे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यावर बंदी घातली. यामुळे शहर आता हळूहळू डिजिटलमुक्त झाले. शिवजयंतीलाही रस्ते सार्वजनिक ठिकाणी फलकांची गर्दी झालेली दिसली नाही. यामुळे अपघातावर आता नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. शहरातील अनेक मुख्य चौक या निर्णयामुळे डिजिटलमुक्त झाले आहेत. पालिकेने या निर्णयाची अगदी कठोरतेने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात साजरे होणारे उत्सव, जयंती, निवडणुकांवेळीही या निर्णयाची अशी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 

१०वर्षांपासून वाढले पेव : डिजिटलफलक तयार करण्याचे तंत्र विकसित झाल्यानंतर याकडे सर्वच घटकांचा कल वाढला. अशात संगणकाच्या माध्यमातून हवी तशी डिझाइन मांडणी करता येत असल्यामुळे डिजिटल अधिकच लोकप्रिय झाले. गेल्या १० वर्षात तर डिजिटलशिवाय कोणताही कार्यक्रम साजरा होत नाही. 

खासगी ठिकाणी परवानगी 
आता यापुढे डिजिटल फलक लावण्यासाठी केवळ खासगी जागेचा वापर करावा लागणार आहे. इमारतीवर, खासगी मोकळ्या जागेत असे फलक लावण्यास मुभा देण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाल्यास पालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. यामुळे आता डिजिटल ‘स्टार’ व्यक्तींना फलक लावताना सार्वजनिक ठिकाण नसल्याची खात्री करावी लागणार आहे. 

कठोर अंमलबजावणी 
- डिजिटल बॅनर,फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाची पालिका कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे.
-मकरंद राजे निंबाळकर, नगराध्यक्ष. 
 
बातम्या आणखी आहेत...