आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मसत्ता म्हणजे फक्त हिंदू धर्मच आहे काय?, अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धर्माच्या नावावर भाजप सरकारने राजकीय पोळी भाजू नये, धर्मसत्ता म्हणजे फक्त हिंदू धर्मच का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, विकासाच्या क्रमवारीत आंध्र प्रदेश, गुजरातनंतर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आला आहे. आज तीन लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. महाराष्ट्र बिघडतोय, रोजगाराच्या बाबतीत किती लोकांना शासकीय, खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या, हे या सरकारने एकदा जाहीर करावे, अशी टीका राज्याचे विधिमंडळाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी केली.

हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘संकल्प’ मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे अादींची उपस्थिती हाेती.

अजित पवार म्हणाले, भाजपच्या राज्यात मंत्री शिवराळ भाषा वापरताहेत, भाजप खुनी, गुंड लोकांना पक्षात स्थान देत आहे. साखर ३५ रुपये किलो आणि तूरडाळ मात्र २०० रुपये किलो, यांच्या काकांनी केली होती काय अशी महागाई? असा प्रश्न करून महागाई, गुंडागर्दी, घोटाळे आदी मुद्द्यांचा पवार यांनी खरपूस समाचार घेतला.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्म अभिप्रेत नाहीत का?. हे सरकार जातीय द्वेष पसरवत आहे. सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या धोरणामुळेच शेतीमाल कचऱ्याच्या भावात विकत आहे. या सरकारच्या पराभवाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून सुरू करण्याची गरज आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करावे, असेही आवाहन अजित पवार यांनी केले. या वेळी इतर नेतेमंडळींनीही पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पवारांनी केले.

आरक्षण ३३ टक्के, उपस्थिती एक टक्काच
महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक रात्री तीन वाजेपर्यंत चर्चा करून मंजूर करण्यात आले होते. पक्षांतर्गत ५० टक्के पदाधिकारी आरक्षण लागू आहे. मात्र, सभागृहात महिलांची उपस्थिती पाहिली तर एक टक्काही नसते, असेही पवार म्हणाले.

भाजपमध्ये नामचीन गंुडांना प्रवेश : मलिक
माफिया मुक्त राज्य करण्याच्या बाता करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसोबत अनेक नामचीन गुंडांचा वावर वाढला असून या गुंडांनी पक्षात प्रवेशही केला आहे. बाबा बोडके, मुन्ना यादव, ललित खोले, पवन पवार, िशवा पवार या गुंडांना राजकीय अाश्रय देण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला.

गुंड व माफियाच्या बळावर भाजपला आगामी निवडणुका िजंकायच्या आहेत. मात्र, जनता भाजपलाच राज्यातून तडीपार करेल, अशी टीकाही मलिक यांनी केली. बाबा बोडके हा गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतो, छायाचित्रे काढतो. त्याची चर्चा व फोटो व्हायरल झाल्यानंतर बोडके हा हावरे कुटुंबीयांसमवेत आला असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिले जाते. मात्र, हावरे यांच्या पत्नीने बोडके हा आधीपासूनच वर्षा बंगल्यावर असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी मलिक यांनी केली.

नागपुरचा गुंड मुन्ना यादव भाजपचा कार्यकर्ता असून त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. जळगावचा ललित खोले, नाशिकमधील पवन पवार. कोल्हापूरचा िशवा पाटील या गुंडांना भाजपने पक्षप्रवेश दिला असल्याचेही मलिक यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...