आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत प्रवासादरम्यान नशा करणाऱ्यांसाठी आता बोगीतच येते कोर्ट; दंड करते, शिक्षाही ठोठावते!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे प्रवाशांनो सावधान... तुम्ही रेल्वेत सिगारेट ओढताना, तंबाखू सेवन करताना, वा कोणतेही व्यसन करताना आढळून आलात तर आर्थिक दंड सोसावा लागेल.कारण खुद्द रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीशच अशा प्रवाशांवर नजर ठेवून आहेत.ते स्वत:  रेल्वेने प्रवास करतात. असे कोणी आढळले तर जागेवरच दंड करतात. गुन्ह्याचे स्वरूप पाहून ते कैदेची शिक्षाही सुनावतात. हे सर्व घडते धावत्या रेल्वेतेचं.रेल्वेत व्यसन, विना तिकीट प्रवास, अवैधरीत्या गाडीत अथवा स्थानकावर खाद्यपदार्थांची विक्री हा रेल्वे कायद्यानुसार  गुन्हा आहे. मात्र तो न्यायालयासमोर यावा लागायचा. यासाठी वेळ व मनुष्यबळ खर्ची पडत असे. आता या आडकाठ्यांना फाटा देत रेल्वे न्यायाधीश आेमशंकर पाटील रेल्वेत जागेवरच कायदा मोडणाऱ्यांना दंड करत आहेत. पाटील यांची जून २०१६ मध्ये रेल्वे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे न्यायाधीश म्हणून काम केले होते. तेव्हा कोर्टाच्या आवारात घाण करणाऱ्यांना त्यांनी चांगलीच अद्दल घडवली होती.
 
हडपसर ते दुधनीपर्यत न्या. पाटील यांचे कार्यक्षेत्र आहे. रेल्वेचे फिरते न्यायालय असल्याने ते न्यायालयीन कामकाजासाठी रेल्वेने सोलापूर, दौंड व वाडी या ठिकाणी जात येत असतात. रेल्वेने प्रवास करताना त्यांना कोणी अनधिकृत विक्रेता अथवा विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी आढळला तर ते स्वत: त्याला जागेवरच दंड करतात. त्यांच्यासोबत कर्मचारीही असतात. यात ३ तिकिट पर्यवेक्षक, १ आरपीएफ व १ जीआरपी कॉन्स्टेबल यांचा समावेश असतो. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा तसेच त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून अशा लोकांचे ते प्रबोधनदेखील करतात.

लोकांनी सुनावले  पण वसा सोडला नाही
नांदेडला असताना एकदा पाटील एसटीने प्रवास करत होते. एक प्रवासी गुटखा खाताना आढळला तेव्हा त्यांनी व्यसन आरोग्यास हानिकारक असल्याचे प्रवाशास सांगितले. यावर प्रवासी संतापला. त्याने पाटील यांनाच सुनावले. काहीच न बोलता न्या. पाटील आपल्या जागी बसले. थोडया वेळानंतर प्रवाशाला चूक उमगली. त्यांनी पाटील यांची हात जोडून माफी मागितली. यानंतर गुटखा खाणार नसल्याचा शब्दही त्याने दिला.
 
टीटींनाही केला दंड!
एकदा त्यांना दौड रेल्वे स्थानकावर तिकीट पर्यवेक्षक गुटखा खाताना आढळला. त्यांनी त्यांचे प्रबोधन तर केलेच शिवाय दंडदेखील केला. पुन्हा असे वर्तन करणार नसल्याची कबुली घेतली. आता न्या. पाटील ज्या गाडीत असतात त्या गाडीतील कोणताही रेल्वे कर्मचारी व्यसन करण्याचे धारिष्ट दाखवत नाही.
एकदा त्यांना दौड रेल्वे स्थानकावर तिकीट पर्यवेक्षक गुटखा खाताना आढळला. त्यांनी त्यांचे प्रबोधन तर केलेच शिवाय दंडदेखील केला. पुन्हा असे वर्तन करणार नसल्याची कबुली घेतली. आता न्या. पाटील ज्या गाडीत असतात त्या गाडीतील कोणताही रेल्वे कर्मचारी व्यसन करण्याचे धारिष्ट दाखवत नाही.