सोलापूर - संभाव्य दहशतवादी हल्ले लक्षात घेता अशा परिस्थितीत तत्पर कारवाई करून दहशतवाद्यांचा नि:पात करण्यासाठी मध्य रेल्वेचे स्वतंत्र एटीएस पथक सज्ज झाले आहे. भारतीय रेल्वेत असे कमांडो पथक स्थापन करणारा मध्य रेल्वे पहिला विभाग ठरला असून या पहिल्या पथकात ४० कमांडोंचा समावेश आहे. १० महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे कमांडो सज्ज आहेत. पंजाब पोलिस व पुण्यातील "फोर्स वन'ने या एटीएस पथकातील कमांडोंना प्रशिक्षण दिले असून सोमवारपासून मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकावर हे कमांडो तैनात करण्यात येतील. असे आणखी कमांडो मध्य रेल्वेच्या उर्वरित विभागात पाठवण्यात येणार आहेत.
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनल लक्ष्य केले. तेव्हा अशा हल्ल्यास तोंड देण्यासाठी तेथे सक्षम यंत्रणा नव्हती. या पार्श्वभूमीवर आरपीएफने निवडक जवानांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले. त्यानुसार १८ ते २४ वयोगटातील जवानांना प्रशिक्षण देण्यात आले. या कमांडोंची तुकडी शनिवारी मुंबईत आली. सोमवारपाूसन लोकलला हे जवान सुरक्षा पुरवतील.
सर्व विभागांत पाठवणार पथक
एटीएस कमांडोजची पहिली तुकडी मंुबईत तर दोन-तीन महिन्यांनंतर प्रशिक्षण पूर्ण करून आणखी एक तुकडी मध्य रेल्वेच्या पुणे, सोलापूर, नागपूर व भुसावळ या विभागांत पाठवण्यात येणार आहे.
अाधुनिक शस्त्रांनी सज्ज
सीएसटी, दादर, कुर्ला, कल्याण, ठाणे इत्यादी महत्वाच्या व प्रवाशांची प्रचंड गर्दी असणाऱ्या स्थानकावर हे जवान तैनात असतील. त्यांच्याकडे अत्याधुनिक एके ४७, एमपी ५ सबमशीन बंदुक, ग्लॉक पिस्टल अशी शस्त्रे असतील. दहशतवाद्यांनी प्रवाशांना आेलीस ठेवले तर प्रवाशांची सुटका कशी करायची, याचे प्रशिक्षणही जवानांना देण्यात आले आहे. पंजाबमध्ये ८ महिने व पुण्यात पोलिसांच्या फोर्स वनकडून हे प्रशिक्षण देण्यात आले.
देशातील पहिला विभाग होण्यात आनंद
- आरपीएफने ४० कमांडोजचे एटीएस पथक सज्ज केले आहे. अशा प्रकारे पहिले पथक तयार करणारा मध्य रेल्वे हा देशातील पहिला रेल्वे विभाग झाला आहे. हा मान आम्हाला मिळतो आहे, याचा आनंद वाटतो. सोमवारपासून मंंुबईतील सर्बन स्थानकावरील लोकल गाड्यांत सुरक्षा पुरवली जाईल. टप्याटप्याने मध्य रेल्वेच्या उर्वरित विभागांतही एटीएस पथकाचे कमांडो पाठवण्यात येतील.
- ए .के.सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक , आरपीएफ, मुंबई.