आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघे ९२ पैसे भरून रेल्वे प्रवासात घेता येतो विमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास विमा योजना सुरू केली. अवघ्या ९२ पैशांत प्रवाशांचा विमा निघतो. रेल्वे अपघातात विमाधारक प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून तर आर्थिक मदत मिळेल, शिवाय आयआरसीटीसीकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. विम्याची रक्कम इतकी कमी असूनसुध्दा अनेक प्रवाशांचे याकडे दुर्लक्ष आहे. अवघे १० ते २० टक्केच प्रवासी याचा लाभ घेत आहेत.
लाभ घेणाऱ्यात वातानुकूलित दर्जाच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शयनयान दर्जाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य व्यक्तींचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. सामान्य प्रवाशांमध्ये विम्याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. अवघ्या ९२ पैशात मिळणारा हा विमा जगातला सर्वात स्वस्त विमा आहे. देशात रोज अडीच ते तीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पैकी ६० टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट काढतात. तर ४० टक्के प्रवासी आरक्षण केंद्रावरून काढलेल्या तिकिटावर प्रवास करतात. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांपैकी २० टक्केच प्रवासी विम्याचा पर्याय निवडतात.

रविवारी कानपूरजवळ इंदूर -पटणा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. यात १४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या गाडीत ६९४ प्रवासी ऑनलाइन तिकिटावर प्रवास करत होते. पैकी केवळ १२८ प्रवाशांनीच प्रवासी विम्याचा पर्याय निवडला होता. हे बहुतांश वातानुकूलित डब्यातील प्रवासी होते.
विम्याचा फायदा असा
ऑनलाइन तिकीट काढताना ऐच्छिक विम्याचा पर्याय निवडणे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला अतिरिक्त ९२ पैसे द्यावे लागतील. विमा काढला तर अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला अथवा अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई आयआरसीटीसी देण्यात येते. तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपयांची भरपाई तसेच जखमी झाल्यास लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते. तसेच सामान चोरीला गेल्यावरदेखील भरपाई मिळते.

^ही सुविधा केवळ ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांसाठीच आहे. देशभरातील एकूण प्रवाशांच्या तुलनेने ६० टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट काढतात. पैकी २० प्रवासी ऐच्छिक विम्याचा लाभ घेत आहेत. यात एसीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.'' पिनाकिन मुरावला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, मुंबई.

बातम्या आणखी आहेत...