कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले दुथडीभरून वाहत असून पंचगंगेचे पाणी या पावसाळ्यात पहिल्यांदा पात्राबाहेर पडले आहे.
जिल्ह्यातील भोगावती आणि पंचगंगा नदीला पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी 31.5 फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण 41 बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी वाहतुकीचे रस्ते पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाची संततधार अजुनही सुरूच आहे.
जिल्ह्यातील 12 तालुक्यात गेल्या 24 तासांत पडलेला मिलिमीटर मधील पाऊस पुढील प्रमाणे-
हातकणंगले 19.45 मी.मि., शिरोळ 11.71, पन्हाळा 48.28, शाहूवाडी 53.67, राधानगरी 81.50, गगनबावडा 125.50, करवीर 40.90, कागल 67.00, गडहिंग्लज 42.57, भुदरगड 51.60, आजरा 70.25, चंदगड 94.00 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 706 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, कोल्हापूरातील दुथडी भरुन वाहणारे नदी-नाले....