आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक खर्च टाळून 500 विद्यार्थ्यांचे पालकत्व, वर्षभरातील शैक्षणिक खर्च उचलणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सर्वच महापुरुषांच्या जयंती उत्सवाला डाममौलाचे स्वरूप येते अाहे. महापुरुषांच्या विचारधनाचे अनुकरण करण्यापेक्षा सोहळ्यांवरच लाखोंचा खर्च करून मंडळांच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करताना दिसतात. डॉल्बी अन् भव्य मिरवणुका, सवंग नृत्याचे प्रदर्शन असे प्रकार अलीकडच्या काळात विविध जयंती सोहळ्यात वाढले अाहेत. मात्र बाळे येथील धर्मवीर संभाजीराजे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने या प्रकारांना फाटा दिला अाहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाला अनुसरून ५०० गरीब गरजू, होतकरू मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे. 
 
‘विद्यादान’ असे नाव दिलेल्या या उपक्रमात बाळे परिसरातील गाेरगरीब गरजू मुलांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात येणार आहे. सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार अाहे. 

विद्यार्थ्यांना दफ्तर, शालेय साहित्यासोबतच जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. अांबेडकर जयंती उत्सवातील मिरवणूक, सजावट आणि इतर अनावश्यक खर्च टाळून मंडळातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. वारद फार्म जिल्हा परिषद शाळेतील ४० मुले , खडक गल्ली जिल्हा परिषद शाळेतील २०१, अंबिकानगर शाळेतील १६०, जांबमुनी प्रशालेतील १७३ मुलांचे पालकत्व घेण्यात येत आहे. 
 
२५ एप्रिलला साहित्य वाटप 
पाचशेमुलांचे पालकत्व स्वीकारण्याचे आमचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात ६२० जणांची नोंदणी झालेली आहे. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता बाळे चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजक महेश मेश्राम यांनी सांगितले. या उपक्रमासाठी राम जाधव, राज सलगर, सुहास कदम, सोहन लोंढे, गुरुभाई कबाडे, शशिकांत तांबे, अतिश बनसोडे, सत्यजित वाघमोडे, सुमित शिवशरण, अतिश शिरसट आदी परिश्रम घेत आहेत. 
 
गेल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत 
धर्मवीर संभाजीराजे शिवजन्मोत्सव मंडळाच्या माध्यमातून संयोजक महेश मेश्राम यांनी गेल्या वर्षापासून जयंतीचा खर्च टाळून वंचितांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षी डॉ. आंबेडकरांची १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२५ विद्यार्थ्यांचे वर्षभर पालकत्व घेण्याबरोबरच जिल्ह्यातील २५आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. 
बातम्या आणखी आहेत...