आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: दारूच्या ‘रेड’ची बातमी ‘लिक’ करतोय कोण?, पोलिसांचे हात रिकामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद: दारूबंदीसाठी रणकंदन घडलेल्या कनगरा (ता. उस्मानाबाद) येथे पुन्हा बेकायदा दारूचा महापूर सुरू झाला आहे. पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तेथे छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर अगदी शिताफीने दारू लपवली जात आहे. छापा पडण्याअगोदरच दारूविक्रेत्याला माहिती मिळत आहे. छाप्याची बातमी कशी ‘लिक’ होत आहे, हे समजत नसल्यामुळे दोन्ही विभागाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत.
 
पावणेदोन वर्षांपूर्वी कनगरा गाव संपूर्ण राज्याला माहिती झाले. दारूबंदीची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांवर दि. २६ मे २०१४ ला मध्यरात्रीनंतर पोलिस अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला. याची आठवण आल्यानंतर आजही ग्रामस्थांचा भीतीने थरकाप उडतो. त्यावेळी लाठीच्या वारामुळे झालेल्या जखमांचे व्रण आजही काही ग्रामस्थांच्या शरीरावर पहाण्यास मिळतात. केवळ बेकायदा दारू विक्रीला विरोध केल्याच्या कारणावरून गावाला या यातना भोगाव्या लागल्या होत्या. त्या प्रसंगापासून अनेक दिवस गावात पोलिसांनीच दारूचा एक थेंब विकू दिला नाही. आता मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावात राजरोजसपणे देशी विदेशी दारूची विक्री जोमात सुरू झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेटजवळच्या शेडमध्ये, कोल्हाटी गल्ली, नांदुर्गा पाटीच्या जवळचा परिसर येथे उघडपणे दारू विकली जात आहे. 
 
महिला ग्रामस्थांनी याची माहिती पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊन दिली आहे. गाव अगोदरच दारूबंदीमुळे चर्चेत असल्यामुळे बेंबळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे यांनी गेल्या दोन आठवड्यात यांनी फौजफाट्यासह छापे मारले आहेत. ग्रामस्थांनी दारूविक्रीची ठिकाणेही दाखवून दिली. मात्र, दोन्ही विभागाला दारू पकडण्यात यश आलेले नाही. पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तेथे पोहोचण्याअगोदर विक्रेते पोबारा करत आहेत. काही वेळा संबंधित व्यक्ती जागेवर सापडत आहे. अगाेदरच माल दडवून ठेवण्यात या व्यक्तीला यश येत आहे. यामुळे दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांना हात हलवत परत यावे लागत आहे. छापा टाकायच्या अगोदरच छाप्याची माहिती दारू विक्रेत्यांपर्यंत पाेहोचत आहे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या फितूरीशिवाय हे शक्य होऊ शकत नाही. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना शोधून कारवाई होणे आवश्यक आहे. 
 
पाठफिरवताच विक्री : बेंबळी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी येथे सातत्याने छापे मारले आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन वेळा छापे मारले आहेत. छापे मारल्यावर पोलिस परतल्यानंतर काही वेळातच दारू विक्रीला पुन्हा सुरुवात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे येथे छापा मारण्याची गरज आहे. 
 
महिलांचे निवेदन :गावातील २२२ महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे दारू विक्रेत्यांची नावे, त्यांची ठिकाणे याचा स्पष्ट उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तरीही दारुचा मागमूस पोलिस एक्साईज विभागाला लागू शकलेला नाही. अत्यंत बेमालूमपणे दारू विक्री केली जात आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. 
 
कारवाई करणार 
- आतापर्यंत कनगरायेथे सातत्याने छापे मारले आहेत. यापुढेही कारवाई सुरू ठेवणार आहे. सध्याही गस्त सुरू आहे.दारू विक्री बंद झाल्याशिवाय कारवाई थांबवणार नाही.
-किरणदांडगे, सपोनि, बेंबळी. 
 
संसार उद्ध्वस्त 
- काही दिवसगावात थांबलेली दारू विक्री पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे गावातील अनेकांचे
संसार उद्ध्वस्थ होत आहेत. अनेक युवकही व्यसनाच्या आहारी गेले आहेत.  
-नागर बाईढोबळे, कनगरा. 

आंदोलन करणार 
- दारु विक्रीमुळे अगोदरच गावात वाईट घटना घडली आहे. पोलिसांनी तातडीने दारू बंद करावी. अन्यथा गावातील महिला मोर्चे काढून मोठे आंदोलन करतील. -मंगलइंगळे, कनगरा. 
राज्य उत्पादन विभागाने गेल्या आठवड्यात छापा मारला. विक्रेत्याजवळ त्यावेळी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या होत्या. माहिती मिळूनही त्याला तातडीने माल हलवता आला नाही. वेळ कमी असल्यामुळे विक्रेत्याने एका पत्र्याच्या पेटीत बाटल्या लपवल्या. अधिकाऱ्याने पेटीचे कुलूप तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, पेटी उघडताच ताफा परतला. यामुळे पेटीतील बाटल्या वाचल्या, या प्रकाराची चर्चा गावात सातत्याने केली जात आहे. 
 
माहिती द्यावी 
- नागरिकांनी फोनकेल्यानंतर तातडीने छापा मारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, माल पकडण्यात यश आले नाही. नागरिकांनी कधीही माहिती दिली तर छापा टाकला जाईल.
-संतोष जगदाळे, निरीक्षक, एक्साईज. 
 
बातम्या आणखी आहेत...