आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहारा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला तीन जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा- येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवित पहिल्या लोहारा नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. चार जागा मिळवित राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असून, काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. सर्वच राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत प्रभाग १७ मध्ये मात्र बाळासाहेब कोरे या अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. दरम्यान, प्रथमच स्वबळावर लढलेल्या भारतीय जनता पार्टीला लोहारेकरांनी साफ नाकारले अाहे. वाशीपाठोपाठ लोहाऱ्यातही भाजपला खाते उघडता आल्याने जिल्ह्यात भाजप अद्यापही बळकटी धरू शकला नसल्याचे स्पष्ट झाले अाहे.

शासनाच्या धोरणानुसार तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. या नवीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १७) मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिवसेना १६ एक पुरस्कृत, राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे १६ अपक्ष अशा एकूण ७३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून उमरगा येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मतमोजणी झाली.

शिवसेनेसाठी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. आमदार ज्ञानराज चौगुले, तालुकाप्रमुख मोहन पणुरे शहरात चार दिवसांपासून ठाण मांडून होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल पाटील - सास्तूरकर, तालुकाध्यक्ष किशोर साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी तर काँग्रेस पक्षासाठी आमदार बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभापती सिद्रामप्पा दुलंगे, अविनाश माळी, नागण्णा वकील, जिल्हा परिषद सभापती बापूराव राठोड यांच्यासह अनेक मातब्बर पुढारी तैनात करून तगडी फिल्डिंग लावण्यात आली होती.

शिवसेनेने नियोजनबद्ध डावपेच आखून निवडणुकीला सामोरे जात आठ जागांवर शिवसेना एक पुरस्कृत अशा एकूण नऊ जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला मात्र केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले. देशांत राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने १३ जागांवर निवडणूक लढविली. मात्र, एकही जागा पक्षाला मिळविता आली नाही. भाजपच्या उमेदवारांना मतदानाची तिशीसुद्धा गाठता आली नाही.
निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी िशवसैनिकांनी जल्लोष केला.

काँग्रेसची तगडी फिल्डिंग
काँग्रेसने या निवडणुकीसाठी तगडी फिल्डिंग लावली. परंतु दारुण पराभव का झाला? हा चिंतनाचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांनी प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेसने प्रथमच चिन्हावर निवडणूक लढवूनही पक्षाच्या पदरात यश पडले नाही.

कादरींची भूमिका महत्त्वाची
पूर्वाश्रमी काँग्रेसचे असलेले मुस्लिम समाजाचे धर्मगुरू अाबुलसाहेब कादरी यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आयुब शेख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने दोघांत सरळ लढत झाली. यात आबुलसाहेब कादरी हे विजयी झाले. धर्मगुरू आबुलसाहेब कादरी यांनी शिवसेनेचा उघड प्रचार केला. त्यामुळे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवण्यासठी चांगलीच मदत झाली. दरम्यान, निकालानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादीने विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून जल्लोष केला.

खराडेंना लॉटरी, राष्ट्रवादीला भोपळा
या निवडणुकीत प्रभाग आठ मधील लढतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. काँग्रेसकडून शहराध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेकडून अभिमान खराडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकुश बंडगर, भारतीय जनता पक्षाकडून शंकरप्पा मुळे यांनी निवडणूक लढविली. परंतु, येथे काँग्रेस शिवसेनेत थेट लढत झाली. यावेळी किशोर पाटील अभिमान खराडे यांना प्रत्येकी १३९ अशी समान मते पडली. यावेळी चिठ्ठी काढावी लागली. यात अभिमान खराडे यांची चिठ्ठी निघाल्याने खराडे यांना विजयी घोषित करावे लागले. भाजपच्या शंकर मुळे यांना तीन मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश बंडगर यांना एकही मत मिळाले नाही.

हे उमेदवार आले निवडून
प्रभागएकमधून राष्ट्रवादीच्या आरती गिरी, प्रभाग दोनमधून राष्ट्रवादीच्या जयश्रीताई वाघमारे, प्रभाग तीनमधून शिवसेनेच्या पौर्णिमा लांडगे, प्रभाग चारमधून काँग्रेसच्या सीमा हरी लोखंडे, प्रभाग पाचमधून शिवसेनेच्या माजी सरपंच निर्मला स्वामी, प्रभाग सहामधून शिवसेनेचे प्रताप घोडके, प्रभाग सातमधून कमल भरारे, प्रभाग आठमधून शिवसेनेचे अभिमान खराडे, प्रभाग नऊमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे गगन माळवदकर, प्रभाग दहामधून शिवसेनेचे श्याम नारायणकर, प्रभाग आकरामधून शिवसेनेच्या सुनीता ढगे, प्रभाग बारामधून शिवसेनेच्या ज्योती मुळे, प्रभाग तेरामधून शिवसेना पुरस्कृत अाबुलसाहेब कादरी, प्रभाग चौदामधून काँग्रेसचे श्रीनिवास माळी, पंधरामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजमीन आयुब शेख, प्रभाग सोळामधून काँग्रेसचे आरिफ खानापुरे, प्रभाग सतरामधून अपक्ष उमेदवार बाळासाहेब कोरे हे विजयी झाले.
बातम्या आणखी आहेत...