आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांचा चौफेर विकास; २५० कोटींची कामे मार्चपासून सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - हायब्रीड अॅन्युटी योजनेतून उस्मानाबाद तालुक्यात सुमारे २५० कोटी रुपयांची विकास कामे होणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत वृक्षलागवड, बस शेड, पदपाथ, सोलर पथदिवे, स्वच्छतागृह, असा चौफेर विकास होणार आहे.या कामांच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली असून, रविवारी (दि.१८) यासंदर्भात नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यासाठी बैठक अायोजित करण्यात आली. बैठकीत नागरिकांनी सूचना मांडाव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यांचा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कायापालट होणार आहे. या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मार्च महिन्यात निविदा निघून वर्षभरात काम पूर्ण होणार आहे. उस्मानाबाद शहरासह तालुक्यात ११५ किलोमीटर अंतराच्या ऱस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरातील १९ किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. रस्त्यांचे रूंदीकरण, वृक्षलागवडीसह बस शेड, स्वच्छतागृह, रस्त्यालगत गटार, पदपाथ, नवीन दुभाजक, दुभाजकाचे लॅण्डस्केपिंग, चौकांचे सुशोभीकरण, सोलर पथदिवे, असा चौफेर विकास करण्यात येणार आहे.

यासंदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर जनतेच्या सूचना विचारात घेण्यासाठी रविवारी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम.थोरात, उपअभियंता बी. डी. राठोड आदी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी.जोशी यांच्यासोबत हायब्रीड अॅन्युटी योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

२५० कोटींच्या या कामांची १५ वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित गुत्तेदाराची असणार आहे. शहराच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी अंदाजे ५० कोटींचा त्यासाठी खर्च अपेक्षित आहे.
{ वर्षात कामे पूर्ण होणार; गुत्तेदाराकडेच १५ वर्षे देखभाल, दुरुस्ती.
स्वच्छतागृहामुळे गैरसोय टळणार : स्वच्छतागृहांअभावीमहिलांची कुचंबना होते. अॅन्युटी योजनेतून स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन असून, शहराचाही त्यात विचार करण्यात येणार आहे.

विकासाचा वेग वाढेल
^शासनाच्या हायब्रीड अॅन्युटी योजनेतून या रस्त्यांचा विकास होणार असून, त्यामुळे नागरिकांचा प्रवास आल्हाददायक होईल. तसेच अन्य सुविधा मिळणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. एकंदर अंदाजे २५० कोटींची कामे झाल्यास तालुक्यात विकासाचा वेग वाढल्याचे दिसून येईल. -राणा जगजितसिंह पाटील, आमदार.

फिरण्यासाठीचा मार्ग सुकर
उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक ते हातलादेवी पायथा हा मार्ग पहाटे वाजेपासून सकाळी वाजेपर्यंत फिरण्यासाठी चालत जाणाऱ्या नागरिकांमुळे फुलून गेलेला असतो. मात्र या मार्गावरून वाहणाऱ्या वाहनांमुळे धोक्याची शक्यता असल्याने आता या मार्गाचे रूंदीकरण करण्यात येणार असून, त्यासोबतच चालणाऱ्यांसाठी पदपाथ करण्यात येणार आहे. पथदिवे बसविण्यात येणार असल्याने मार्गावरून चालणाऱ्यांना अंधाराचा धोका राहणार नाही.

या रस्त्यांचा होणार विकास
उस्मानाबाद तालुक्यातील हद्दीतल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती, रुंंदीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यामध्ये ढोकी-कळंब २५ किलोमीटर रस्ता, उस्मानाबादेतील तेरणा महाविद्यालय ते कौडगाव, उस्मानाबाद ते बेंबळीमार्गे पाटोदा फाटा, शिवाजी चौक ते शिवली फाटा, डीआयसी रोड ते जिजाऊ चौक, जिजाऊ चौक ते शिवाजी चौक, बीएसएनएल कार्यालय ते वरूडा रस्ता, अण्णाभाऊ साठेचौक ते वैराग रोड (शासकीय वसतिगृहापर्यंत), या रस्त्यांचा समावेश असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...