आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कन्येची उस्मानाबादकरांकडून उपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय खो-खो संघाने बांगलादेशला लोळवत सुवर्णपदक पटकावले. हा अभिमानाचा, आनंदाचा उत्सव संपूर्ण देशभर साजरा झाला. खो-खोच्या मैदानावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या भारतीय संघाचा तर ऊर अभिमानाने भरून आला.
मात्र, देशाला बहुमान मिळवून देणाऱ्या या संघाचे नेतृत्व केलेल्या सारिका काळे या कन्येची तिच्या गावानेच उपेक्षा केली आहे. गुवाहाटीमध्ये(आसाम) सामना जिंकल्यानंतर दिवसांपूर्वी गावी परत आलेल्या सारिकाचे कौतुक करण्याएवढेही दातृत्व उस्मानाबादकरांकडे शिल्लक राहिले नाही. खेदजनक बाब म्हणजे जिल्ह्यात ६० हून अधिक असणाऱ्या क्रीडा संघटनाही तिच्या कौतुकासाठी पुढे आल्या नाहीत.

शेतजमीन नाही, वडील अपंग तर आई दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालिवते. भाऊ-बहीण, चुलते-चुलती, आजी-आजोबा असे १० जणांचे एकत्रित कुटंुब. मात्र, आर्थिक कमाई नसल्यामुळे परिस्थिती जेमतेमच. आजोबांच्या जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्तीनंतर उस्मानाबाद शहरातील गवळीवाडा भागात घर बांधले; पण बँकेकडून काढलेल्या कर्जाचे हप्तेही भरायला पैसे नाहीत. एकंदर समस्यांच्या गर्तेत असलेल्या अतिसामान्य कुटुंबातील सारिका काळे हिने नुकत्याच पार पडलेल्या खो-खोच्या स्पर्धेत देशाचे नेतृत्व केले. ती संघाची कर्णधार होती, त्यामुळे ती चर्चेत आली. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय संघ अजिंक्य ठरला. संघाने देशाला वैभव मिळवून दिले. त्यात सारिकाच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे. पाच देशांबरोबर खेळून भारतीय संघाने हे यश मिळविले पण, संघाची कर्णधार स्वत:च्या गावातच उपेक्षित दिसून आली. वास्तविक, गुवाहाटीच्या सामन्यातील यशानंतर परतल्यावर उस्मानाबादेत तिच्या कौतुकाचे सोहळे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे सत्कार सोहळेच नव्हे तर तिला आणण्यासाठी रेल्वेस्थानकावर तिच्या कुटंुबाव्यतिरिक्त अन्य व्यक्ती नव्हत्या. केवळ घराशेजारी वास्तव्याला असणारे गोविंद लोमटे यांनी तिच्यासाठी हार आणि पेढ्याचा बॉक्स खरेदी केला. या बातमीनंतर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी हार-तुरे देऊन सारिकाच्या सन्मानाची औपचारिकता पार पाडली. मात्र, सारिकाने ज्या क्षेत्रात नैपुण्य मिळविले, त्या क्रीडा क्षेत्राला तिचे कौतुक करावे वाटलेच नाही. एरव्ही वेगवेगळ्या क्रीडा संघटना अपरिचित असलेल्या खेळातून आपले अस्तित्व सांगत असतात. अशा संघटनेचे पदाधिकारीही आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाल्याने त्यांना सारिकाचे वावडे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सारिकाच्या आगमनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ट्वीट करून सारिका काळे महाराष्ट्रासाठी गौरव असून, तिचा सन्मान केला जाईल, असे जाहीर केले.

विस्मरणानेचउद्धवदादांच्या विचारांची उपेक्षा : देशालाशेतकरी धोरणाची दिशा देणारे, संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झंझावात निर्माण करणारे भाई उद्धवरावदादा पाटील हे थोर नेतृत्व उस्मानाबादचे. मात्र, त्यांच्या निधनानंतर जिल्ह्याला त्यांचा विसर पडला. पक्की वैचारिक बैठक, सभागृह गाजविणारे प्रभावी भाषण आणि शेतकऱ्यांविषयी मजबूत धोरण आणणाऱ्या दादांचा विसर पडल्याने त्यांच्या विचारांची उपेक्षा झाली. दादानंतर महाराष्ट्राला दखल घ्यायला भाग पाडणारे सक्षम नेतृत्व जिल्ह्यात तयार झाले नाही. संघर्षातून पुढे आलेल्या आपल्या मातीतील भूमीपुत्रांचे विस्मरण त्यामुळेच नुकसानकारक ठरू शकते.
सत्कार करू

सारिकाकाळेहिच्या आगमनाबाबत आजच कळाले. मी उस्मानाबादला नव्हतो, आजच आलो. तिचा सन्मान व्हायलाच हवा होता. मी तातडीने जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी बोलतो. प्रशासनाच्या वतीने आपण सत्कार करू. -डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी

देश पातळीवरील संघाची कर्णधार होणे, ही साधी बाब नाही. त्यामुळे निवड झाली तेव्हाच सारिकाचे कौतुक होणे अपेक्षित होते. ‘दिव्य मराठी’ मुळे सारिकाचे कर्तृत्व पुढे आले. मोजक्याच महिलांना कर्णधारपद मिळते. ते यश सारिकाने मिळविले. तिचे कौतुक झाल्याने खेद वाटतो. -डॉ. चंद्रजीत जाधव, सरचिटणीस,राज्य खो-खो असोसिएशन.

सरकारी अनास्था
सारिकाच्या कर्तृत्वाचा उस्मानाबादकरांनाच नव्हे तर सरकारी यंत्रणेलाही विसर पडला. जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालकमंत्री आणि खासदार, आमदारांनीही तिची उपेक्षा केली. कन्येचा गावाने मिरवणूक काढून सन्मान करायला हवा, अशी भावना व्यक्त होत आहे.