आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांनी तक्रार पेटी बसवावी अन् पोलिसांसमक्ष उघडावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचा आदेश शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिला आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मुख्याध्यापक, पोलिस प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष त्या उघडायच्या अाहेत. गंभीर आणि संवेदनशील तक्रारींवर पोलिसस्तरावर पुढील कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन त्याचे निवारण करणे ही शाळांचीच जबाबदारी. उपयुक्त सूचनांवर तातडीने उपायही अपेक्षित आहेत. काही तक्रारींवर शासन स्तरावर मार्गदर्शन अपेक्षित असेल अशा तक्रारी शासनाकडे पाठवाव्यात. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील, याची पुरेपूर काळजी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. शिवाय शिक्षण संचालक, उपसंचालक, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली. तक्रारींचे निवारण तातडीने करण्याची सूचना आहे. 
 
लैंगिक छळ तक्रारी महिला समितीसमोर 
महिलाशिक्षक किंवा विद्यार्थिनी यांच्या लैंगिक छळाविषयीच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवण्यात याव्यात. शाळेतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर मांडण्यात याव्यात. या दोन्ही विषयांवर महिला तक्रार निवारण आणि शाळा व्यवस्थापनाने तातडीने दखल घेऊन त्यावर निर्देश द्यावेत. 
 
नियंत्रण आयुक्तांकडे 
१. या परिपत्रकातील निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी अधिकारी स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पर्यवेक्षीय जबाबदारी शिक्षण आयुक्तांकडे राहील. 
२.विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याच्या कार्यवाहीचा अाढावा घ्यावयाचा आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची माहिती सादर करावयाची आहे. 
३. जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील माहिती द्यावी. 
४.शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करून तक्रार निवारण तातडीने करायचे आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...