आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी शहराध्यक्ष पाटील यांचा राष्ट्रवादीला सलाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रसचे माजी शहराध्यक्ष शंकर पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. वैयक्तीक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धाडलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 
श्री. पाटील सध्या प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी होते. त्यांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात काम करत अाहे. पक्षाने विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल पक्षाचे आभारही त्यांनी मानले आहेत. 

वयाच्या सत्तरीत असलेले पाटील समाजवादी विचारांचे म्हणून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात ओळखले जातात. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जारी करण्यापूर्वीपासून ते राजकारणात सक्रीय झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून काम केले. जनता पक्षात ते प्रांतिक पातळीवर कार्य केले. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादीसोबत गेले. आरंभीची काही वर्षे ते ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते यांच्या निकटवर्तीय होते. त्यातून त्यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी वर्णी लागली होती. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. जनता पक्षात असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला जोरदार विरोध केला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे श्री. पाटील यांनी दिव्य मराठीकडे स्पष्ट केले. एकूणच त्यांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे दिसत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...