आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख कर्जावरील व्याज माफ करा, हप्तेही पाडून द्या; शरद पवारांची सरकारला सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली, त्यानुसार त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू केली, ही समाधानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने ही याेजना यशस्वी व्हायची असेल तर वास्तव लक्षात घेणे अावश्यक आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ केले, पण दीर्घ मुदतीचे पीककर्ज माफ करण्यासाठी अट घातली आहे. एकीकडे देशातील अनेक कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत असताना दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी अट घातली जात अाहे. दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले अनेक शेतकरी अटीमुळे वंचित राहतील. त्यामुळे सरकारने दीड लाखावरील दीर्घ मुदतीच्या कर्जाचे व्याज पूर्णपणे माफ करावे आणि दीड लाखापेक्षा अधिक कर्जाला पुढील १० वर्षांचे हप्ते पाडून द्यावेत, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य शासनाला केली.  
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त  वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार शरद बनसोडे, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, सत्कारमूर्ती बळीराम साठे, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह आमदार, जि.प. सदस्य आदी उपस्थित होते. साठे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.   

‘साठे यांना जिल्हा परिषद सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष पदेही मिळाली, मात्र त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. अपयशातून ते मार्ग काढून यशस्वी झाले. स्वत:साठी कधीही पदे मागितली नाहीत, मात्र या भागातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न मांडत राहिले, त्यांची सोडवणूक केली,’ असे साठेंबद्दल गाैरवाेद्गार पवारांनी काढले.  

कर्जमाफीची मागणीच न करण्यासाठी सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालास उत्पादन खर्च आधारित भाव द्या, मुबलक पाणी द्या, त्यांना खते-बियाणे, नवीन तंत्रज्ञान दिल्यास अर्थव्यवस्थेला एक गती येईल. उत्तर तालुक्यातील द्राक्षांनी जगाच्या बाजारात नाव कमावले आहे, भविष्यात ही शिरापूर उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास उत्तर तालुक्यात मोठी क्रांती होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

प्रतिकूल परिस्थितीतही पवारांमुळे संधी : साठे  
सत्कारास उत्तर देताना साठे म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचता आले. तालुका लहान, त्यातही ३५ वर्षे राखीव असल्याने जिल्हा परिषदेच्या पुढे संधीच नाही. राजकारणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शरद पवार यांच्यामुळे सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्षपदी संधी मिळाल्याचे साठे यांनी स्पष्ट केले. यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल यांनीही मनोगत व्यक्त केले.   

पवारांकडे अनेकांची कुंडली : देशमुख  
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मी बळीराम साठे यांचा भाचा असल्याचे सांगून भाषणाची सुरुवात केली. ‘५१ वर्षे साठे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेवा केली. तालुका आरक्षित असल्याने त्यांना संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराम साठे मोठे झाल्याचे ते म्हणाले. पवारांनी अशा अनेकांना मोठे केले. तसेच अनेकांची कुंडलीच पवारांकडे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...