आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजार दुचाकींची फेरी, मावळ्यांच्या वंशजांची हजेरी, जोशपूर्ण मिरवणुकीसह जन्मोत्सव साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित दुचाकी फेरीतील सुमारे ४००० दुचाकींचा सहभाग, शिवरायांच्या मावळ्याच्या वंशजांचा सहभाग, मध्यवर्ती समितीची जोशपूर्ण मिरवणूक, युवतींच्या ढोल ताशा पथकाचा दणदणाट, भगवे झेंडे, फेटे, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट घालून शिवरायांचा जयघोष करत फिरणारे युवक, चौकाचौकातील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वनिक्षेपकांवरील पोवाडे यामुळे शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्याने शहरात चैतन्याचा संचार झाला होता. 
 
शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने रविवारी शिवजयंतीनिमित्त महाभिषेक एकात्मता फेरीचे आयोजन करण्यात आले. शिवरायांच्या पुतळ्यापासून फेरीला सुरुवात करण्यात आली. फेरीचे नेतृत्व मावळ्यांचे वशंज संग्राम जेधे, करणराजे बांदल, शशी कंक, तुषार धुमाळ, संग्राम कोंढे - देशमुख, चेतन मारने यांनी केले. आनंदा काशिद आजारी असल्यामुळे फेरीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्यासमवेत सोहळा समितीचे सुमारे ४००० दुचाकीस्वार कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुपारी फेरीला सुरुवात करण्यात आली. शहरातील ताजमहल चित्रमंदिर, भाजी मंडई, नेहरू चौक, निंबाळकर गल्ली, पोस्ट कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी दुचाकी फेरी फिरवण्यात आली. यामध्ये प्रत्येक दुचाकीवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने जोशात शिवरायांचा जयजयकार करत, हातातील झेंडे नाचवत कार्यकर्ते दुचाकीवर जात होते. फुलांच्या माळांनी सजवलेल्या रथामध्ये शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती. याच रथामध्ये सर्व मावळ्यांचे वंशज विराजमान झाले होते. सुमारे तीन तासानंतर शिवाजी चौकातच फेरीचा समारोप करण्यात आला. तत्पुर्वी सकाळी मध्यवर्ती समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी महाअभिषेक केला. यावेळी अमोल पाटोदेकर, अनंत उंबरे, संजय निंबाळकर, एकनाथ राजेनिंबाळकर, संजय वाघमारे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. यानंतर जिजामाता उद्यानाजवळ शिवमूर्तीचे पूजन माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एम. डी. देशमुख, भालचंद्र हुच्चे, समियोद्दीन मशायक, अभय इंगळे, राजाभाऊ पवार उपस्थित होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जिजामाता उद्यानापासून मध्यवर्ती समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. याचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, मोतीचंद बेदमुथा, भारत कोकाटे, दत्ता बंडगर आदी उपस्थित होते. बँड पथक डॉल्बीच्या दणदणाटात जोरदार मिरवणूक काढण्यात आली. झुंबर लावलेल्या रथात शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आला होता. रंगबेरंगी झुंबर सजावटीमुळे रथ आकर्षक वाटत होता. मिरवणुकीत हातात झेंडे घेऊन अनेक युवकांनी जोरदार बेफाम होऊन नृत्य केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषनांमुळे शहर दुमदुमुन गेले होते. मिरवणूक शिवरायांप्रमाणे वेशभूषा करून घोड्यावर बसून अनेक युवक सहभागी झाले होते. 
 
१०० रिक्षांद्वारे मोफत सेवा : शिवजयंती निमित्तशनिवारी रात्रीपर्यंत सुमारे ७०० प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे काम १०० रिक्षांनी केले. शहरातील नवजीवन सहकारी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराजे गुंडाळे, अध्यक्ष सचिन गुंडाळे, व्यवस्थापक श्रीकृष्ण जाधव, रिक्षा युनियनचे प्रकाश पांढरे, उल्हास उंबरे यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. विविध उत्सवासाठी असे उपक्रम राबवणार असल्याचे नितीनराजे गुंडाळे यांनी सांगितले. 

शासकीय अधिकाऱ्यांची शिवजयंती :शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अधिकारीही सरसावले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार ए. जे. पठाण यांनी प्रतिमा पूजन केले. जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी भीमा पडवळ, आशा बंडगर, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर कोंपले उपस्थित होते. 

शहरात ५५ ठिकाणी स्थापना : शहरात विविध शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने ५५ ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेची पुतळ्याची स्थापना केली होती. प्रत्येकी गल्लीत भगवे झेंडे, कमाणी लावल्या होत्या. सर्व शहरात भगवे वातावरण तयार झाले होते. बसस्थानक, आगार, रिक्षा संघटना, नगरपालिकेच्या गाळ्यातील व्यापारी आदींनीही शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी भव्य मंडप उभारलेले होते. 
 
३९१ जणांनी केले रक्तदान 
श्रीसाई सामाजिक सांस्कतिक मंडळाच्या वतीने शिवाजी चौकात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३९१ युवकांनी रक्तदान केले. प्रत्येकाला मोफत आठ जीबीचा पेनड्राईव्ह भेट देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रोहित निंबाळकर, गणेश राजेनिंबाळकर, मंगेश भुजबळ, सौरभ शेळके, दीपक गणेश, प्रवीण पाटील उपस्थित होते. यावेळी महिला युवतींनी रक्तदान केले. 

मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान 
मावळ्याच्यावंशजांचा नेहरू चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरही त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामुळे दुचाकीच्या फेरीच्या दरम्यान या सन्मानामुळे राष्ट्रीय एकात्मतेचेही दर्शन सर्वांना घडले. 

स्वयंस्फूर्तीने शिवभक्तांची सेवा 
शहरात परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच प्रत्यक्ष दुचाकी फेरी मिरवणुकीत हजारो युवक सहभागी झाले होते. अशात रखरखत्या उन्हामुळे उष्णता वाढली होती. ही परिस्थिती ओळखून स्वयंस्फूर्तीने अनेकांनी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. काळा मारुती चौकातील महोत्सव समिती, निंबाळकर गल्ली, शिवाजी चौक, ताजमहल चित्रमंदिर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

युवतींच्या ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधले 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी माजी खासदार पद्मसिंह पाटील, बलराज रणदिवे, नितीन बागल, रोहित पडवळ आदी. 
 
पुढील स्लाईडवर पाहा,  मिरवणूकीचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...