आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी मोर्चा, दुपारी जनप्रक्षोभ, सायंकाळी सिद्धेश्वर कारखान्याच्‍या चिमणीसाठी तडजोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - विमान उड्डाणास अडचण ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील चिमणी पाडकामावरून शुक्रवारी चांगलेच नाट्य रंगले. चिमणी बचावासाठी कारखान्याचे कामगार आणि शेतकऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवला. तर दुसरीकडे चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने पोलिस बंदोबस्त घेऊन कारवाईची जोरदार तयारी केली.
 
मात्र कामगारांच्या आक्रमक भूमिका घेत कारवाई विरोध केला. मनपाचे जेसीबी रोखून धरले. काही कामगारांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तर काही जण जेसीबीसमोर झाेपले. विरोध लक्षात घेऊन चिमणी पाडकाम मोहीम थांबवावी लागली. महापालिका अाणि कारखाना आमने-सामने आलेले असताना सायंकाळी मुख्यमंत्र्यांचा आदेश घेऊन जिल्हाधिकारी घटनास्थळी आले. तीन महिने पाडकामास स्थगिती दिल्याचे त्यांनी जाहीर करताच दिवसभर चाललेल्या नाट्यावर पडदा पडला. एकूण शहरात शुक्रवारी दिवसभर चिमणी पाडकामाची चर्चा चांगलीच रंगली होती. 
 
चिमणी पाडकामास विरोध करत कारखान्याचे कामगार शेतकरी यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. राजकीय षडयंत्रातून चिमणी पाडण्यात येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. एकीकडे चिमणी बचावासाठी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पाडकामाची तयारी करण्यात येत होती. महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन दोन तास चर्चा केली. त्यानुसार महापालिका अधिकारी, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलिस कमांडो पथक, पोलिस अधिकारी, कर्मचारी, मक्तेदारांचे कर्मचारी, स्पिकरसह सुमारे ३०० जणांचा फौजफाटा दुपारी साडेतीन वाजता घेऊन कारखाना स्थळावर दाखल झाले. कारखाना प्रवेशद्वारावरच पथकाला अडवण्यात आले. चिमणी बचाव, कारखाना बचाव आदी घोषणा देण्यात आल्या. विरोध पाहून पोलिस महापालिका अधिकारी शांत राहिले. तासभर घोषणाबाजी सुरू होती. 
 
चिमणी पाडण्यामागे राजकीय षडयंत्र, नेत्यांचा आरोप 
विमानसेवेस अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडू नये, यासाठी कारखान्याचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी भाषणामध्ये कारखान्याच्या चिमणीचा यापूर्वी कधीच अडथळा आला नव्हता. आता चिमणी पाडण्यामागे राजकीय डाव असून, सत्तेतील लोकच षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला. 
बातम्या आणखी आहेत...