आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या सोलापूर बसपोर्टचा ‘प्रवास’ बैठकांवरच रखडला; घोषणा कागदावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- परिवहन राज्यमंत्री लाभलेल्या सोलापूर शहराला बसपोर्ट मंजूर झाले खरे; मात्र त्या बसपोर्टच्या प्रवास बैठकाच्या पुढे काही केल्या जात नाही. सुरुवातीचे पाच ते सहा महिने सोलापुरात कुठे बसपोर्ट बांधायचे हे ठरवण्यात, जागा निश्चित करण्यात गेले. जुना पुना नाका की सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक यावर काथ्याकूट झाला. सहा महिन्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवरच बसपोर्ट उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण प्रत्यक्ष बांधणीच्या हालचाली सुरू झाल्याच नाहीत. बसपोर्टचा प्रवास हा मंदावलेलाच राहिला. केवळ सूचना बैठका या भोवतीच बसपोर्टचे काम सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. खुद्द परिवहन राज्यमंत्र्यांच्या शहरातील बसपोर्टच्या कामाला गती मिळत नाही, हे दुर्दैव. 

विमानतळांच्या धर्तीवर राज्यातील बसस्थानकांचा विकास करत नव्याने बसपोर्ट उभारायचे अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली खरी मात्र राज्यात अद्यापही बसपोर्टच्या कामाचा नारळ काही फुटला नाही. सोलापूर बसपोर्टचा प्रवास तर अद्याप बैठकापुरताच मर्यादित राहिला आहे. बैठकांच्या पुढे बसपोर्टचा विषय जात नसल्याने अद्याप कामांची निविदा निघालेली नाही. अजूनही किमान दोन महिने तरी बसपोर्टची निविदा निघणार नाही अशीच शक्यता आहे. 

सुमारे वर्षभरापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोलापूरसह राज्यातील निवडक बसस्थानकांचा विकास एअरपोर्टच्या धर्तीवर करित त्याला बसपोर्ट असे नाव दिले. मात्र आजतागायत याच्या कोणत्या कामास प्रारंभ झाला नाही. सोलापूर बसपोर्टबाबत पहिले सहा ते सात महिने जागा निश्चितीसाठीच गेले. यासाठी बैठकांवर बैठका झाल्या. 

बसपोर्ट हे जुना पुणे नाका की मध्यवर्ती बसस्थानकावर करायचे, यावर काथ्याकुट झाले. अखेर मध्यवर्ती बसस्थानकावरच बसपोर्ट करण्याचे ठरले. जून ते जुलै दरम्यान सोलापूर बसपोर्टच्या कामाची निविदा निघणार होती. मात्र तीही अद्याप निघाली नाही. कारण याचे कारण दर बैठकीवेळी कोणता तरी नवी मुद्दा येतो आणि चर्चेसाठी पुन्हा बैठक घ्यावी लागते. बैठकांचे सत्र असेच सुरू राहिल्याने अद्याप कामाची निविदाच निघालेली नाही. परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख हे सोलापूरचे आहे. तरीदेखील बसपोर्टचा प्रश्न काही केल्या मार्गी लागेना. या संबंधी परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

दर बैठकीत नवा मुद्दा 
सोलापूर बसपोर्टबाबत आयोजित केलेल्या बैठकीस दर वेळेस नवा मुद्दा येतो. नवीन सूचना येते. बसपोर्ट हे चांगल्या प्रकारे उभे करायचे असल्याने सर्व सूचनांचा विचार करणे गरजेचे आहे. लवकरच सोलापूर बसपोर्टविषयी निविदा काढणार आहोत.
- सुभाष शास्त्री, विशेष अधिकारी, बसपोर्ट, मुंबई. 
बातम्या आणखी आहेत...