आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी खरटमल यांची निवड, धर्मा भोसले प्रदेश सरचिटणीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आगामी महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली. शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल, जिल्हाध्यक्षपदी पानीवचे प्रकाश पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तर, प्रदेश सचिव असलेले धर्मा भोसले आता सरचिटणीस म्हणून काम पाहतील.

शहराध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे होता. त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची वारंवार मागणी केली. पण, पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी उभारण्याचा धोका असल्याने हालचाली मंदावल्या होत्या.
दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस वाढली होती. खरटमल यांच्यासह प्रा. अजय दासरी, राजन कामत हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण, अनुभव अन्् ज्येष्ठ नेत्यांच्या खास मर्जीतल्या खरटमल यांनी बाजी मारली. मावळते शहराध्यक्ष यलगुलवार यांच्याकडे पूर्वीचे प्रदेश सरचिटणीसपद कायम ठेवले आहे. तसेच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष धर्मा भाेसले यांचे प्रदेश सरचिटणीसपदी प्रमोशन झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या असून दोन दिवसांमध्ये शिंदेंच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्षपदी पाटील
ग्रामीण भागातही काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. जिल्हाध्यक्षपदी पानीव येथील प्रकाश पाटील यांची निवड केली. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माळशिरस तालुक्यातील व्यक्तीची पहिल्यांदा निवड झाली आहे. श्री. पाटील यांच्या पत्नी श्रीलेखा या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा होत्या.