आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा दूध संघाला उतरती कळा; संकलन 50 टक्के अाटले, वितरण ढेपाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संचालकांशी संबंधित दूध संस्थांकडील थकबाकी, ढेपाळलेले दूध संकलन आणि वितरण यंत्रणेमुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाला उतरती कळा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी दररोज सरासरी लाख २९ हजार लिटर दूध संकलन करणाऱ्या दूध संघाचे संकलन सव्वा लाख लिटरच्याही खाली आले आहे.
 
दूध उत्पादकाबराेबरच कामगार वर्गही अस्वस्थ आहे. दूध संस्थांकडील थकबाकी वाढत असून दूध संघावरील कर्जाचे व्याजही वाढत आहे. हे सावरण्याचे काम करण्याऐवजी दूध संघातील तरुण नेते मंडळी ‘मलई’ खाऊन एकमेकांवर कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत. ज्येष्ठ नेतेही सगळी दुरवस्था माहीत असूनही उघड्या डोळ्याने पाहात मूग गिळून गप्प आहेत. 

महाराष्ट्रातील नावाजलेला दूध संघ म्हणून सोलापूर जिल्हा दूध संघाची ओळख होती. ही ओळखच पुसून टाकण्याचे काम मलईखाऊ नेत्यांनी सुरू केले आहे. अतिशय कठीण आणि संघर्षमय परिस्थितीतून जिल्हा दूध संघाची निर्मिती झाली होती. १० तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या दूध संघाने दूध संकलन, वितरण आणि उपपदार्थांच्या विक्रीचे विक्रम रचले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभांश देण्यातही दूध संघ अग्रेसर होता. अर्थात बहुतांश सोसायट्यांमधून लाभांश सामान्य उत्पादकांपर्यंत जाता नेत्यांच्या खिशात जायचा. त्याला काही अपवादही होते. गेल्या वर्षात दूध संघाच्या कारभाराला नजर लागली की काय, असे वाटू लागले आहे. विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दूध संघाचा वापर केला जात आहे. 

दूध संघातील या गोंधळाचा फायदा घेऊन जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरच्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सोसायट्यांनी, खासगी डेअऱ्यांनी जिल्ह्यातील दूध वितरण आणि संकलन यंत्रणेचा ताबा घेतला आहे. दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्यासह काही संचालक सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत अाहेत. दूध संघातील संचालकांशी संबंधित दूध संस्थांना विविध कारणांसाठी देण्यात आलेली कोटी रुपयांची अनामत रक्कम थकीत आहे. वसुलीसाठी कागदी घोडे नाचविले जात आहेत. दुसरीकडे वाढता तोटा कमी करण्यासाठी दूध संकलन आणि वितरण मजबूत करण्याऐवजी संघाची मालमत्ता विकण्याची नामुष्की आली आहे.

यापूर्वीच शिस्त लावली असती तर... 
दूधसंघाला यंदाच्या आर्थिक वर्षात कोटींचा तोटा झाल्याचे संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी सांगितले होते. कर्मचाऱ्यांनी वेतनाबाबत तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माजी आमदार सुधाकर परिचारक आणि प्रशांत परिचारक यांच्या पंढरपुरातील निवासस्थानी आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, संघाचे उपाध्यक्ष मनोहर डोंगरे आदी नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतरही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कायम असून दूध संकलन आणि वितरणाची बोंब कायम आहे. यातील बहुतांश नेते मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी बैठका घेतात. अशाच बैठका त्यांनी दूध संघाच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी घेतल्या असत्या. वेळीच तरुण नेत्यांचे कान टोचून आर्थिक शिस्त घालून दिली असती तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या जिल्हा दूध संघाला वाईट दिवस पाहावे लागले नसते, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे. 
बातम्या आणखी आहेत...