सोलापूर- आगामी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून निष्ठावंत तरुणांना उमेदवारी देण्यात येईल. ७५ पेक्षा जास्त जागा जिंकून पालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता येईल, असा दावा काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला. मागील निवडणुकीतील काँग्रेसच्या जाहीरनामातील ८० टक्के विकासकामे पूर्ण केली असून मतदार पुन्हा काँग्रेसला सत्ता देतील, असेही त्यांनी सांगितले. शहरातील पाणी समस्येला फक्त प्रशासकीय अधिकारी जबाबदार असून त्यांच्या गलथान कारभारामुळेे पाण्याचा प्रश्न पूर्णत: सुटला नाही, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक शनिवारी काँग्रेस भवनमध्ये झाली. त्यानंतर आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत खरटमल बोलत होते. यावेळी महापाैर सुशीला आबुटे, सभागृहनेते संजय हेमगड्डी, ज्येष्ठ सदस्य अॅड. यू. एन. बेरिया आदी उपस्थित होते.
श्री. खरटमल म्हणाले, “काँग्रेसच्या नगरसेविकांना भरपूर विकासनिधी मिळाला असून त्याद्वारे प्रत्येक वॉर्डामध्ये विकासकामे पूर्ण झालीत. पुढीलचार ते पाच महिन्यांमध्ये अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसपक्ष तरुणांना जास्त संधी देणार असून पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर होणार असून मी फक्त त्यासाठी शिफारस करणार आहे.”
अॅड. बेरिया म्हणाले, “मागील निवडणुकीतील जाहीरनाम्यातील ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. उर्वरीत २० टक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूरला कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मिळाला. शहराचा सर्वांगीण विकास काँग्रेसने शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केला आहे.”
पालकमंत्री देशमुख अपयशी
गेल्या दोन वर्षांमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना शहराच्या विकासासाठी एकही रुपयाचा निधी आणता आला नाही. काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी उद््घाटन केलेल्या कामांना पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मंजुरी मिळाली होती. केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार राज्य केंद्र शासनातर्फे सुरू असल्याची टीका अॅड. बेरिया यांनी केली.
काँग्रेसमुळेच स्मार्ट सिटीत समावेश
काँग्रेस पक्षाने केलेल्या विविध विकासांच्या जोरावर सोलापूरचा समावेश स्मार्ट सिटी योजनेमध्ये झाल्याचा दावा अॅड. बेरिया यांनी केला. स्मार्ट सिटीसाठी काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद आहे. पण, प्रत्यक्षात भाजपचे नगरसेवक नेतेमंडळी सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहे. स्मार्ट सिटीद्वारे फक्त एक हजार कोटींचा निधी मिळणार आहे. पण, प्रत्यक्षात त्याबाबतची प्रसिद्धी अन् मोठेपणा मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. भाजपच्या चुकीच्या गोष्टींना काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. विकासकामांना विरोध केल्यास सर्वसामान्यांच्या हितासाठी आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.
पाणीप्रश्नाचे प्रशासनावर फोडले खापर
शहरातील पाणीटंचाईच्या समस्येला फक्त पालिकेचे निष्क्रिय प्रशासन पूर्णत: जबाबदार आहे. प्रशासनाच्या नियोजशून्य कारभारामुळेच पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याचा आरोप अॅड. बेरिया यांनी केला. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी काँग्रेसचे नगरसेवक नेहमी सकारात्मक दृष्टीने प्रयत्नशील होते. पण, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अडचण आली.
परिवहनची अडचण तुम्हालाच माहीत
जाहीरनाम्यामध्ये शहरामध्ये मेट्रो सेवेचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात महापालिकेची परिवहन सुविधा अडचणीत आहे. ४० बसेस देखील रस्त्यावर व्यवस्थित सुरू नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, परिवहनबाबत तुम्हाला सगळंच माहीत आहे की? असे सांगत उत्तर देण्यास दुर्लक्ष करीत पत्रकार परिषद उरकली.
महापौरांच्या विरोधात तक्रार
काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक काँग्रेस भवन येथे झाली. जास्त विकासनिधी मिळण्याची मागणी केली. जनसंपर्क वाढवून नागरी प्रश्नाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना देण्यात आली. महापौरांच्या कामकाजावर नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली, रफीक हत्तुरे, मधुकर आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक आंदोलन करत असताना महापौरांनी भेट घेतली नाही. आमच्या विषयास मंजुरी दिली जात नाही. आम्ही निधी आणण्यासाठी प्रयत्न केला, पण कामाचे परस्पर उद्घाटन केले आदी तक्रारींचा पाढा वाचला. महापौर सुशीला आबुटे यांनी बाजू मांडत खुलासा केल्याचे सांगण्यात आले.