आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापुरात 1409 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा परिषदेच्या ६८, पंचायत समितीच्या १३६ तर महापालिकेच्या १०२ जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी २,३४१ तर महापालिकेसाठी ८९६ केंद्रांवर मतदान करण्यात येणार आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ४०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.   
 
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप व आघाडीचे उमेदवार अाहेत. तर महापालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम, माकप, बसपा, रिपाइं व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी रणजितकुमार व मनपा आयुक्त वियजकुमार काळम-पाटील यांनी मतदानाची तयारी व मतमोजणीच्या ठिकाणी पाहणी केली. 
 
जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २७८, पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८८ तर महापालिकेच्या १०२ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी ३ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी बाहेरून १ हजार पोलिस, ६०० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी मागविली आहे. जिल्हा परिषदेसाठी ४ हजार पोलिस तैनात केले आहेत. यामध्ये होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या एका तुकडीचा समावेश आहे. 

जिल्ह्यात १५ मिनिटात तर शहरात ३ मिनिटात कोठेही अप्रिय घटना घडल्यास पोलिस पाेहचतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर व पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...