आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या शहराध्यक्षांनी प्रदेश कार्यालयास अहवाल पाठवला, पालकमंत्री हतबल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलाव प्रश्नावरून झालेल्या मतदानावेळी भाजपचे काही नगरसेवक ऐनवेळी सभागृहाबाहेर गेले. तसेच अपशब्द वापरल्याच्या कारणावरून महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्थायी समिती सभापती संजय कोळी यांना निलंबित केले. याप्रकरणी अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली. 

या प्रकरणात भाजपचे ते १६ नगरसेवक मतदानावेळी बाहेर का गेले? स्थायी समिती सभापतींनी महापौरांबद्दल अपशब्द काय आणि का वापरला? आदी सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी शनिवारी संवाद साधला. यानंतर याचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठवून दिला. रविवारी दुपारी भाजप कार्यालयामध्ये उमाताई कापरे यांची बैठक होती. त्यावेळी या विषयावर संवाद होईल अशी चर्चा होती. मात्र कापरे यांचा दौरा रद्द झाला आणि बैठक झाली नाही. 

गाळ्यांच्या लिलावप्रश्नी सत्ताधारी भाजपने सूचना मांडली. यावर विरोधी पक्ष शिवसेनेने उपसूचना मांडली. इतर पक्षाच्या सर्व गटनेते आणि वरिष्ठ नगरसेवकांनी सूचना आणि उपसूचना दोन्ही चांगल्या आहेत. मात्र सूचनेमधील ई-टेंडरिंग अर्थात लिलाव शब्द वगळा. बाकी सर्व उत्तम आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी तो शब्द वगळला नाही. अखेर यावरून मतदान घेण्याचे ठरले. भाजपचे काही नगरसेवक सभागृहाबाहेर गेले अन् भाजपचा पराभव झाला. यानंतर स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी महापौरांबद्दल अपशब्द वापरल्यावरून महापौरांनी त्यांना सहा महिन्यासाठी निलंबित केले. सहकार मंत्री आणि पालकमंत्री गटातील वाद काही केल्या संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामावर होत आहे. 

महापौरांना अधिकार नाही 
मतदानावेळी भाजपचे१६ नगरसेवक बाहेर जात होते, तेव्हा महापौर शांत होत्या. त्यांना रोखले नाही. ते बाहेर गेल्यावर मतदानाचा आदेश दिला. मतदानात भाजपचा पराभव झाल्यानंतर आम्ही काही नगरसेवक सभागृहाबाहेर जात होतो. तेव्हा सभागृहाबाहेर जाऊ नका, अन्यथा कारवाई करेन, असे महापौरांनी सांगितले. मग मी त्यांना ‘विरोधक आणि पतींना विचारूनच सभागृह चालवा, आमची काय गरज आहे,’ असे बोललो. यात काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असे वाटत नाही. नगरसेवकास केवळ तीन दिवसांसाठी निलंबित करण्याचा अधिकार महापौरांना आहे. सहा महिन्यांकरिता सभागृह आणि स्थायी समितीतून निलंबन करण्याचा अधिकार महापौरांना नाही.
- संजय कोळी, निलंबित सभापती, स्थायी समिती 
 
ती सगळी हुशार माणसं, मी काय करू शकतो..? 
महापालिका सभेत शनिवारी घडलेल्या नाट्यप्रकरणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हात वर केले. म्हणाले, “ती सारी हुशार माणसं. मी काय करू शकतो...” त्यांच्या बोलण्यात हतबलता होती. पक्षीय पातळीवर काय दखल घेतली? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले नाही. महापौर शोभा बनशेट्टी यांना उद्देशून अपशब्द उच्चारल्याबद्दल स्थायी समिती सभापती संजय कोळी यांना निलंबित करण्यात आले. या घडामोडींवर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला. पालिकेतील एकूण कारभाराविषयी ते नाराज असल्याचे स्पष्ट जाणवले. परंतु ते उघडपणे बोलत नव्हते. पदाधिकाऱ्यांना उद्देशून, ‘ती हुशार माणसं, शहाणी माणसं...’ असा उल्लेख केला. अधिक बोलणे टाळले. दरम्यान, पक्षाचे वरिष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, “मी मुंबईच्या बाहेर आहे. नेमके काय घडले याचा अहवाल पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे आलेला असावा. तो पाहून प्रतिक्रिया देणे उचित ठरेल.” 

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी मात्र, प्रयत्न करूनही फोनवर संपर्क होऊ शकला नाही. 
बातम्या आणखी आहेत...