आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांच्या मागण्या रेल्वे अधिकाऱ्यांनी धुडकावल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिशाभूल करणारी माहिती देत रेल्वे अधिकाऱ्यांनी सोलापूरकरांच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. हुबळी -सिकंदराबाद एक्स्प्रेस होटगीवरून सोलापूरपर्यंत आणावी, गुलबर्गा -हैदराबाद सोलापुरातून सोडावी, सोलापूर -पूणे पॅसेंजरला शयनयान दर्जाचा जादा डबा जोडावा अादी मागण्यांचा समावेश होता. 
 
सोलापूरकरांच्या वतीने या मागण्यांचे पत्र खासदार शरद बनसोडे यांनी रेल्वे खात्याकडे दिले होते. त्या पत्राला उत्तर देताना अधिकाऱ्यांनी पाचपैकी एकाही मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. उलट दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे आता रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन विषय मांडणार असल्याचे खासदार बनसोडे यांनी सांगितले. 

काही दिवसापूर्वी श्री. बनसोडे यांनी रेल्वे प्रश्नांविषयी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांची भेट घेऊन पत्र दिले होते. त्यावरून रेल्वे खात्याने नुकतेच श्री. बनसोडे यांना उत्तर धाडले आहे. 

या होत्या मागण्या 
हुबळी-सिकंदराबाद एक्स्प्रेस होटगीवरून सोलापूरपर्यंत आणावी, गुलबर्गा -हैदराबाद इंटरसिटी सोलापूर येथून सोडावी, सोलापूर -पूणे पॅसेंजरला शयनयान दर्जाचे डबे जादा जोडावेत, फलाट क्रमांक एक अाणि तीनवर सरकता जिना बसवण्यात यावेत, मुंबई - सोलापूर एक्स्प्रेसचे डबे रिकाम्या वेळेत वापरून सोलापूर ते पुणेदरम्यान नवी गाडी सुरू करावी. 

या प्रश्नांवर रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊ 
^रेल्वेप्रशासनाने दिलेले उत्तर प्राप्त झाले. यात कोणतीच ठोस भूमिका प्रशासनाने मांडली नाही. आता या प्रश्नी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूूंची भेट घेऊनच सोलापूरचे प्रश्न मार्गी लावले जातील.” अॅड.शरद बनसोडे, खासदार 

रेल्वे खात्याकडून मिळालेले उत्तर 
{हुबळी -सिकंदराबाद एक्स्प्रेस होटगीवरून सोलापूरपर्यंत आणली तर दीड तासांचा अतिरिक्त वेळ लागेल. 
{गुलबर्गा - हैदराबाद इंटरसिटी सोलापूर येथून सोडण्यासाठी सोलापूर ते गुलबर्गादरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होणे गरजेचे आहे. दुहेरीकरण झाल्यानंतर या मागणीचा विचार केला जाईल. 

{सोलापूर -पुणे पॅसेंजरचे तीन जनरल डबे बंद करून दौंडपर्यंत नेण्यात येतात. हा विषय केंद्रीय रेल्वे मंडळ मध्य रेल्वेच्या मुख्यालयाअंतर्गत येतो. अतिरिक्त डबा जोडावा, असा प्रस्ताव पाठवला आहे. निर्णय मुख्यालयाकडून घेण्यात येईल. 

{फलाट एक आणि तीनवर सरकते जिने लावण्याचे काम पुणे विभागाच्या कामासोबत सुरू केले जाईल. निविदा प्रक्रिया सुरू आहे. 
{मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसचे डबे सोलापूर ते पुणेदरम्यान चालवण्यासाठी वाकाव -भिगवनदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणे गरजेचे आहे. त्यानंतरच या मागणीचा विचार केला करण्यात येईल. 

वस्तुस्थिती ही 
१.सोलापूर ते होटगीदरम्यान १६ किमीचे अंतर आहे. हे अंतर कापण्यासाठी एक्स्प्रेसला १८ मिनिटे तर पॅसेंजरला २५ मिनिटे लागतात. होटगी ते सोलापूर सोलापूर ते होटगीसाठी अशा दोन्हीसाठी जवळपास ३६ मिनिटे लागतील. गाडीला १० मिनिटांचा थांबा देऊन त्यादरम्यान इंजिनची दिशा बदलली जाऊ शकते. होटगी स्थानकावरदेखील इंजिनची दिशा बदलली जाते. जास्तीत जास्त ५० मिनिटांत हे साध्य होऊ शकते. मात्र प्रशासनाने यासाठी दीड तासाचे कारण दिले आहे. 

२. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण २०१६ पर्यंत होणे क्रमप्राप्त होते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने कामाला मुदतवाढ देण्यात आली. आता २०२० पर्यंत दुहेरीकरणाचे काम होईल, असे सांगण्यात येते. सर्व निधी उपलब्ध असताना मुदतीत काम पूर्ण झाले नाही. याला कोण जबाबदार? रेल्वेच्या गलथानपणाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना का? 

३. दुहेेरीकरणाचे काम सुरू असताना अन्य विभागाच्या जवळपास आठ ते नऊ गाड्या सोलापूर स्थानकावरून धावतात. मग या गाड्यांना दुहेरीकरणाचे कारण सांगून थांबवले का नाही? दुसऱ्या विभागाच्या गाड्यांना मार्ग उपलब्ध करून दिले जाते. पण, सोलापूरचा प्रश्न आला की मार्ग उपलब्ध नसल्याचे का कारण दिले जाते? 
बातम्या आणखी आहेत...