आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष दीक्षांत: प्रोटोकाॅल बाजूला ठेवून बोलतोय, शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर विद्यापीठ. विशेष दीक्षांत समारंभात सोलापूर विद्यापीठातर्फे राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डी. लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यावेळी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रभारी कुलसचिव पी. प्रभाकर, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांची उपस्थिती होती. - Divya Marathi
सोलापूर विद्यापीठ. विशेष दीक्षांत समारंभात सोलापूर विद्यापीठातर्फे राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डी. लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यावेळी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रभारी कुलसचिव पी. प्रभाकर, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांची उपस्थिती होती.
सोलापूर - राज्यपाल असलो तरी आता प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी बोलतोय. सुशीलकुमार शिंदे यांना दिलेल्या मानपत्रातून त्यांचा प्रेरणादायी प्रवास लक्षात येतो. पेपर टाकणारा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो, चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो, उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे श्री. शिंदे देशाचे गृहमंत्रीसारख्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. माझ्या मते भारतातील प्रगल्भ लोकशाहीमुळे हे शक्य हाेते, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी येथे केले. 
 
सोलापूर विद्यापीठात बुधवारी विशेष दीक्षांत समारंभात राज्यपाल राव यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी श्री. शिंदे यांच्यासाठी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील, प्रभारी कुलसचिव पी. प्रभाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
कुलगुरू डॉ. मालदार यांनी अहवाल वाचन केले. श्वेता हुल्ले यांनी मराठीतील मानपत्राचे वाचन केले. इंग्रजी मानपत्राचे वाचन प्रा. मनोहर जोशी यांनी केले. सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक ई. एन. अशोककुमार यांनी पदवी प्रदान करण्यापूर्वी अनुग्रह करण्याची विनंती केली. 
सोलापूर विद्यापीठाच्या बंदिस्त सभागृहात सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रारंभी दीक्षांत समारंभाची मिरवणूक निघाली. परीक्षा मंडळाचे संचालक बी. पी. पाटील ज्ञानदंड घेऊन अग्रभागी होते. सभागृहात २०० विशेष निमंत्रित उपस्थित होते. सभागृहाबाहेर उभारण्यात आलेल्या विशेष शामियान्यात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. येथे ५०० आसनव्यवस्था होती. राज्यपालांची उपस्थिती असल्याने नियोजनबद्ध आटोपशीर कार्यक्रम आखण्यात आला होता. वेळेच्या कारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे मुख्य दीक्षांत भाषण होऊ शकले नाही. त्याची लिखित भाषणपुस्तिका वितरीत करण्यात आली. 
श्री. शिंदे म्हणाले, राज्यपाल विद्यासागर राव हे तेलंगणा येथील. आंध्र प्रदेशचा मी राज्यपाल होतो. केंद्रीय मंत्रिमंडळातही होते. ते साहित्याविषयक लेखनही करतात. आज प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी माझ्याबद्दलचे भाव व्यक्त केले, याबद्दल मी समाधानी आहे. सोलापूर विद्यापीठाची स्थापना एका जिल्ह्यापुरती म्हणून काहींनी विरोधी सूर काढला खरा. पण अमेरिका इतर पाश्चात्य देशातही एका डिस्ट्रिक्टमध्ये चार चार विद्यापीठे असतात. शिक्षणाची साधने तळागाळातील वर्गापर्यंत सहज पोचली पाहिजेत. 

ज्ञानाचा हा मार्ग विद्यापीठे दाखवतात. आधुनिक भारताच्या जडणघडणीत शिक्षणाचे असलेले महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे. याच विचारातून सोलापूर विद्यापीठ स्थापनेचे बिल विधानसभेत संमत करून घेतले. 

खरे तर एका जिल्ह्यापुरते विद्यापीठ म्हटल्यावर राजकीय विरोधी सूर उमटला असता. म्हणून शुक्रवारी रात्री जेव्हा सगळे सदस्य आपापल्या मतदारसंघात परततात, तेव्हा विधानपरिषदेत मांडले. त्याच दिवशी विधानसभेतही उपस्थित सदस्यांच्या अनुमतीने संमत करून घेतले. सोमवारी जेव्हा सभागृहात चर्चा झाली तेव्हा सगळ्यांना बिल संमतीबाबत समजले. मला वाटते ही चतुराई नव्हती तर शिक्षणाचे साधन तळागाळातील वर्गापर्यंत सहज पोहचले पाहिजे ही जाणीव मनात होती. एक जिल्हा एक विद्यापीठ हा विचार त्यातूनच पुढे आला. 

सोलापूर विद्यापीठाने अवघ्या काही वर्षातच आपल्या अथक परिश्रमातून चांगले नावलौकिक प्राप्त केला. तंत्रज्ञान वापराबाबत सोलापूर विद्यापीठाने इतर विद्यापीठांनाही मागे टाकले. डिजिटल पदवी प्रमाणपत्र देणारे सोलापूर विद्यापीठ भारतातील पहिले विद्यापीठ ठरले. ही बाब अधिक भूषणावह आहे. ही प्रगती अखंडित सुरू राहावी, यातूनच सोलापुरातील असंख्य विद्यार्थीही उद्या नासासारख्या विविध संस्थेत संशोधनपर कार्य करतील, नवनवी झेप घेतील, अशी आशा मला वाटते. 

कालच शरद पवार सोलापुरात आल्यानंतर मला बोलले की पूर्वीचे खेडे सोलापूर आता खूपच बदलले आहे, शहरी प्रगती दिसून येते आहे, सोलापूर बदलते आहे, बदलाचा हा वेग लक्षात येईल, असा आहे. सोलापुरात टॅलेंट आहे, पण त्याला एक्स्पोझर नाही. ही ज्ञानशक्ती देण्याचे कार्य सोलापूर विद्यापीठाच्या हातून होत आहे. या ज्ञानसंस्काराच्या माध्यमातून विद्यार्थी प्रगतीची झेप घेतील. 
 
 
विद्यापीठाची ही पदवी म्हणजे आईने दिलेली पदवी 
सोलापूर विद्यापीठाने दिलेली पदवी ही आईकडून मिळालेली पदवी समजतो, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी सहा वर्षाचा असताना वडील वारले, दोन आया होत्या, त्याही आता नाहीत. तसा निराधारच आहे. आता आई म्हणजे पत्नीच आहे. सोलापूर विद्यापीठाने मला दिलेली पदवी ही आईकडून मिळालेली पदवीच मानतो. यापूर्वीही संस्था, विद्यापीठाकडून मानद पदवी मिळाली पण मी नावापुढे डॉक्टरेट लावत नाही. कारण मानद पदवी वेगळी आणि संशोधन करून, कष्टाने मिळालेली डॉक्टरेट पदवी ही वेगळी, असे मी मानतो. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...