सोलापूर - निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात दारूची आवक झाली. राज्य उत्पादन शुल्क खात्याने आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकामार्फत केलेल्या कारवाईत सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक किमतीची दारू जप्त केल्याची माहिती खात्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
आतापर्यंत शहराच्या पूर्वभागात अनेक ठिकाणी छापे घातले. त्यात देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. जिल्ह्यातही कारवाई केली. आतापर्यंत २०२ जणांवर गुन्हे दाखल केले. १५७ संशयितांना अटकही केली. त्याबरोबर हातभट्टी दारू, रासायनिक ताडी, देशी-विदेशी मद्य, फ्रूट बिअर अशा सर्व प्रकारातील हजार ७०० लिटरची दारू जप्त केली. वाहने ताब्यात घेतली. ४९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केल्याचे श्री. धोमकर म्हणाले. भवानी पेठ, घोंगडे वस्ती, मोदी लष्कर, नीलमनगर, विडी घरकुल, सुनीलनगर आदी भागांत हातभट्टी दारू आणि रासायनिक ताडी छुप्या पद्धतीने विकली जात आहे. प्लास्टिकच्या बंद पिशव्यांतून ते ग्राहकांच्या हाती मिळते.
नगरच्या विषारी दारू पार्श्वभूमीवर सतर्क
- नगर येथे विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेले. त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष माेहीम उघडली. दररोज ढाबे, हॉटेल्सची तपासणी सुरू केली. चेक नाक्यांवरही तपासणी सुरू अाहे. अशा प्रकाराविषयी नागरिकांनीही पथकाला माहिती द्यावी.
सागर धोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
सूत्रधारांना अटक करा
- प्रमुख राजकीय पक्षांची कार्यकर्ते मंडळी दारू वाटपात गुंतली आहेे. त्यांच्यावर माकपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवले. माहिती दिली. परंतु यंत्रणा संबंंधित पक्षाच्या सूत्रधाराला सोडून सामान्य कार्यकर्त्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे गरीब मतदारांना प्रलोभने देऊन त्यांना लुटणारे कोण, हे समोर येत नाही.
नरसय्या आडम, माकपचे ज्येष्ठ नेते