आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्कंडेय विद्यालयाच्या बसमध्ये १२२ विद्यार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुरुवारी सोलापुरात आरटीओच्या पथकाने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये तब्बल १२२ विद्यार्थी आढळले. या बसची क्षमता ४९ आसनांची असताना १२२ विद्यार्थी दाटीवाटीने कोंबले होते. त्यांचा हा प्रवास रोजचाच असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बसमधील विद्यार्थ्यांची ही स्थिती पाहून अधिकारीही अवाक् झाले. 
 
शालेय विद्यार्थी वाहतूक सुरक्षित व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. रिक्षा चालक आणि स्कूल बस चालक यांना सांगूनही सुधारणा होत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा पवित्रा अवलंबला. पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत रिक्षा चालकांच्या कृती समितीने आम्ही बेकायदा वाहतूक करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, तो शब्द पाळला गेला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून बेकायदा वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. 

गुरुवारी स्कूल बसवर करण्यात आलेल्या कारवाईत अरकाल स्कूल, एसव्हीसीएस, कुचन प्राथमिक विद्यालय आणि मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. मोटार वाहन निरीक्षक विजय लोखंडे योगेश गिधाई यांनी ही कारवाई केली. 

पालकांनो जागे व्हा 
रिक्षा असो की स्कूल बस पालकांसमोरच त्यांचा पाल्य वाहनात बसतो. कोणी स्टेअरिंगजवळ तर काेणी रिक्षांच्या दांड्यावर बसलेला असतो. मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवले जाते. याचे पालक साक्षीदार असतात. तरीही संबधित वाहनचालकांना विरोध करत नाहीत. कमी पैशात आपला पाल्य शाळेला जातो, यातच ते धन्यता मानतात. तेव्हा पालकांनी जागे होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करता कामा नये. 

^ज्या ज्याठिकाणी बेकायदा विद्यार्थी वाहतूक होईल त्या त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. बजरंग खरमाटे, आरटीओ, सोलापूर 
 
बातम्या आणखी आहेत...