आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयारी मार्गाचा अंतिम सर्व्हे पूर्ण, मोहोळकरांना दिलासा, वीस कोटी ८९ लाख रुपयांची आहे आवश्यकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - येथील अपघाती झोन असलेल्या कन्या प्रशाला चौकातील भुयारी मार्गाचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर विभाग यांनी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला अाहे. या चौकाच्या भुयारी मार्गासाठी २० कोटी ८९ लाख रुपयांची प्रस्तावित रक्कम आहे. यासाठी स्वतंत्र इंजिनिअर, नकाशा तयार करण्यात आला आहे. भुयारी मार्गाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने मोहोळकरांतून आनंद व्यक्त होत आहे.
सर्वात धोकादायक आणि अपघाती क्षेत्र म्हणून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कन्या प्रशाला चौकाकड़े बघितले जाते. या चौकात गेल्या आठ वर्षामध्ये ६३ अपघात झाले अाहेत. त्यामध्ये २९ जणांना आपला प्राण गमवावा लागला आणि ५५ जण गंभीर जखमी झाले. वयोवृद्ध, महिला, शाळकरी मुले या चौकातून रस्ता ओलांडताना करत असलेली कसरत ‘दैनिक दिव्य मराठी’ने वारंवार प्रशासनापुढे मांडली. या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा म्हणून अनेक सामाजिक संघटना, शाळा रस्त्यावर उतरल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते अॅड. विनोद कांबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भुयारी मार्गाची आवश्यकता पटवून दिली .कन्या प्रशालेतील विद्यार्थी अादित्य कुंभार या मुलाचा त्याच चौकात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी पाठपुरावा करत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपली कैफियत निवेदनाद्वारे मांडली होती. मोहोळचे तहसीलदार बी. आर. माळी यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या चौकाचा सर्व्हे करून पाठपुरावा केला. ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. अंतिम सर्व्हे करून कामासाठी २० कोटी ८९ लाख रुपये आवश्यक असल्याचा प्रस्ताव राष्ट्रीय प्राधिकरणास पाठविला आहे.

-भारतीय राष्ट्रीयराज्य महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभागाकडून कन्या प्रशाला चौकाचा अंतिम सर्व्हे झाला अाहे. यासाठी २० कोटी ८९ लाख रुपयांचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविला आहे. त्याबाबतचे पत्र माहितीस्तव प्राप्त झाले अाहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळून भुयारी मार्गाचे काम सुरू होईल.''
बी.आर. माळी, तहसीलदार, मोहोळ

६३ अपघातांमध्ये २९ जणांचा बळी
रस्ता रुंदीकरण हाइवे झाल्याने सन २००८ ते २०१६ या कालावधीत अनेक प्रवासी, शाळकरी मुले अशा २९ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. या क्षेत्रात चार शाळा आणि बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी तोच मुख्य मार्ग असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. भुयारी मार्ग झाल्यास त्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. अपघाती क्षेत्राचा शिक्का पूसट होईल.

-एस टीसी क्र १३९/२०१५ नुसार सोलापूर विद्यापीठ/ कन्या प्रशाला चौक यावली चौकाच्या भुयारी मार्गासंदर्भात मी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग होणे आवश्यक आहे. तो होईपर्यत कायदेशीर लढ़ा सुरूच राहील.''
अॅड.विनोद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते मोहोळ
बातम्या आणखी आहेत...