आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक वेतनासाठी डीसीसीला १.५८ कोटी ,आरबीआयची हायकोर्टात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे १.५८ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
रिझर्व्ह बँकेचे वकील व्यंकटेश धोंड म्हणाले की, शिक्षकांच्या वेतनासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला १.५८ कोटी रुपये पाठवले आहेत. हे पैसे शिक्षकांच्या खात्यावर जमा होतील किंवा धनादेशाच्या माध्यमातून वेतन अदा केले जाईल. जर बँकेला अथवा एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे हवे असतील तर त्यांनी स्टेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधवा. त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल. न्यायमूर्ती ए.एस. ओक आणि अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेला शिक्षकांच्या वेतनाचा विचार करण्यास सांगितले होते. कारण हे वेतन मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून केले जाते. पण नोटबंदीमुळे जिल्हा बँकांत पैसे जमा करण्यास बंदी घालण्यात आली होती.
खंडपीठाने हे विचारल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या वकिलांनी वरीलप्रमाणे निवेदन दिले. मुंबई, सोलापूर, नाशिक, पुणे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या १४ नोव्हेंबरच्या परिपत्रकाला आव्हान दिले होते. ५०० १००० च्या नोटा मध्यवर्ती बँकेत ठेवण्यास किंवा बदलण्यास बंधने घालण्यात आल्याच्या विरोधातही ही याचिका होती.

सहायक महाधिवक्त अनिल सिंग यांनी खंडपीठाला माहिती दिली की नोटबंदीसंदर्भात ज्या काही याचिका विविध ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर अथवा एकाच उच्च न्यायालयासमोर सुनावणीस घ्याव्या, अशी मागणी केंद्र सरकारने एका बदली याचिकेद्वारे केली आहे. याची सुनावणी गुरुवारी होणार आहे. उच्च न्यायालयाने सहकारी बँकांबाबतची सुनावणी १९ डिसेंबरला ठेवली आहे.
बातम्या आणखी आहेत...