आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले, ‘परिवहनचा कायमस्वरूपी तोडगा काढू’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागात बसची संख्या घटत चालली असून, असलेल्या १० व्हाॅल्वो बस बंद पडल्या आहेत. २३ बस रस्त्यावर आहेत. परिवहनच्या कामगारांचे पाच महिन्यांचे वेतन थकले आहे. परिवहन विभागाची आवस्था दयनीय असून, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी करण्यात आली. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सांगितल्याची माहिती परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी दिली.  
 
परिवहन विभागात २३ बस रस्त्यावर असताना तेथे कायम कर्मचारी १४० आहेत. त्यांना काम नाही. १९९२ पासून रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या वाहकांकडील साहित्य परिवहन विभागाने जमा करून घेतले. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टींसह अन्य कर्मचारी परिवहन व्यवस्थापक श्रीकांत म्याकलवार, सभागृह नेता सुरेश पाटील यांची भेट घेऊन वेतन देण्याची मागणी केली. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले. 

व्हाॅल्वोच्या दहा बस बंद 
शहरात वातानुकूलित बस फिराव्यात, अशी इच्छा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची होती. त्यांनी पुढाकार घेऊन जेएनयूआरएम योजना मंजूर करून आणली. दहा व्हाॅल्वो बस घेतल्या. त्यापैकी एकही बस रस्त्यावर धावत नाही. दहा बस धक्क्याला लागल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी ४.५ लाख रुपये कंपनीचे देणे आहे. ते देण्याऐवजी मिनी बस रस्त्यावर आणल्या जात आहेत. त्या बस पुढील काळात रस्त्यावर येतील की नाही, अशी शंका आहे. 

कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न 
परिवहन उपक्रमांसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख पुढाकार घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बैठक घेऊ शकले नाहीत. पुढील काळात बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले. याची कल्पना पालकमंत्री देशमुख यांनी परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर यांना दिली. 

अंटद यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव 
महापालिका परिवहन विभागातील उपव्यवस्थापक गिरीश अंटद यांना बडतर्फ करणे आणि त्यांची चौकशी करून फौजदारी दाखल करण्याचा प्रस्ताव महापालिका परिवहन समितीसमाेर अाहे. गुरुवारी समितीची सभा तहकूब केली. त्यामुळे निर्णय झाला नाही. परिवहन विभागात कार्यरत असलेले अंटद यांना २००४, २०१० आणि २०११ मध्ये निलंबित केले. त्यानंतर त्यांना चौकशीअधीन राहून कामावर घेण्यात आले. ते पुन्हा कामावर आल्यावर नगरोत्थान योजनेत खरेदी करण्यात आलेल्या बसप्रकरणी त्यांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे शहराचे नुकसान झाले. संगनमत करून चुकीचे काम केले. तरीही ते त्याच विभागात कामास आहेत. त्यांना बडतर्फ करून चौकशी आणि फौजदारी दाखल करा, असा प्रस्ताव शिवसेनेचे परिवहन समिती सदस्य तुकाराम मस्के, परशुराम भिसे यांनी दिला. सोलापूर ते मोहाेळ बस बंद करणे, सुटेभाग खरेदी करणे आदी विषय परिवहन समितीसमाेर आहेत. गुरुवारी समितीच्या सभेत विषय होते. पण परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी सभा तहकूब केली. त्यामुळे निर्णय होऊ शकले नाहीत. 
 
बातम्या आणखी आहेत...